Fri, Apr 26, 2019 18:07होमपेज › Marathwada › दुसर्‍या टप्प्यातील 52 कोटी 66 लाख रुपयांचा निधी प्राप्‍त

दुसर्‍या टप्प्यातील 52 कोटी 66 लाख रुपयांचा निधी प्राप्‍त

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 29 2018 10:21PMपरभणी : प्रदीप कांबळे

 खरीप हंगाम 2016-17 मधील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन हजारो हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले. त्याची भरपाई शासनाने घोषित करून पहिल्या टप्प्यातील 52 कोटी 66 लाख रुपयांच्या निधी पैकी 42 कोटी 12 लाख रुपये निधीचे वाटप बिम्स प्रणालीद्वारे करण्यात आले. दुसर्‍या हप्त्यातील 52 कोटी 66 लाख रुपये निधी प्राप्‍त झाला असून पहिल्या हप्त्यातील शिल्‍लक 10 कोटी 54 लाख रुपये निधीसह दुसर्‍या हप्त्यातील प्राप्‍त  52 कोटी 66 लाख रुपये निधी अशा एकूण 63 कोटी 20 लाख रुपये रकमेचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 

बोंडअळीने ग्रासल्यामुळे शेतकर्‍यांच्या पांढर्‍या सोन्याचे होत्याचे नव्हते झाले होते. कापसाची बोंडे झाडालाच सडून जात होती. वेचणीस आलेला कापूसही कीडयुक्‍त असल्याने उत्पादन घटले होते. अशात पिकाच्या वाढीसाठी कीटकनाशके व खतांवर खर्च केलेला पैसाही निघणे कठीण झाले. कापसाच्या उत्पादनावर मोठी अपेक्षा ठेवून असलेल्या शेतकर्‍यांचा बोंडअळीने अपेक्षाभंग केला. यामुळे शेतकर्‍यांचे पूर्ण अर्थकारण बिघडले. 

शिवाय रब्बीची पेरणी करण्यासाठी पैसा व्याजबट्ट्याने काढावा लागला. यामुळे तणावग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी न्यायासाठी शासनाकडून नुकसानभरपाई करून देण्याची मागणी केली. अनेक मोर्चे, आंदोलने, निवेदने देऊन पाठपुरावा केल्यानंतर शासनाने  नुकसान भरपाई घोषित केली.