Fri, Jul 19, 2019 05:02होमपेज › Marathwada › बीडच्या ट्रॅफिक पोलिसांसाठी बॉडी ऑन कॅमेरा उपलब्ध

बीडच्या ट्रॅफिक पोलिसांसाठी बॉडी ऑन कॅमेरा उपलब्ध

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 14 2018 10:20PMबीड : प्रतिनिधी

मुंबई पोलिस वाहतूक शाखेच्या धर्तीवर बीडमधील ट्रॅफिक पोलिसांसाठीही आता बॉडी ऑन कॅमेर्‍याचा वापर होणार आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयात आज दुपारी वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचार्‍यांना कॅमेर्‍याचे प्रात्यक्षिक करून दाखवत प्रशिक्षणही देण्यात आले. लवकरच सदरील कॅमेरे पोलिस कर्मचार्‍यांना वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. बॉडी ऑन कॅमेर्‍याचा वापर करणारा बीड हा राज्यातील दुसरा तर मराठवाड्यातील पहिला जिल्हा असणार आहे. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलिस दलाने कात टाकली असून जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे. बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांना आता बॉडी ऑन कॅमेरा मिळणार आहे. मुंबई पोलिस वाहतूक शाखेच्या धर्तीवर हा प्रयोग बीड जिल्ह्यात करण्याचे ठरविण्यात आले असून आज दुपारी पोलिस अधिक्षक कार्यालयात सदरील कॅमेरा वापराचे प्रशिक्षण वाहतूक कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे. 

कॅमेर्‍यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग तसेच फोटो घेण्याची सुविधा असल्याने वाहन चालकांवर कार्यवाही करताना वाहन चालक व सदर कर्मचार्‍यातील संपूर्ण संवादाचे चित्रीकरण होणार आहे. वाहतुक पोलिसांच्या कार्यवाहीदरम्यान वारंवार उद्भवणार्‍या तक्रारींना आळा बसणार असून कॅमेर्‍यामुळे यापुढे पारदर्शकपणे कार्यवाही होणे शक्य होणार आहे. मुंबईनंतर अशा प्रकारच्या कॅमेर्‍याचा वापर करणारा बीड हा राज्यातील दुसरा तर मराठवाड्यातील पहिला जिल्हा असणार आहे.