Fri, Apr 19, 2019 12:37होमपेज › Marathwada › रक्‍त देऊन बालिकेस दिले बळ

रक्‍त देऊन बालिकेस दिले बळ

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:36PMपरभणी : प्रदीप कांबळे

बी पॉझिटीव्ह गटाचे रक्‍त परभणीत मिळत नसल्याने  चिंताग्रस्त झालेल्या आई-वडील व नातेवाईकांकडे पाहून सदरील रुग्णालयातील कर्मचार्‍याने आपल्या गावाकडील मित्रासह 3 वर्षांच्या बालिकेस रक्‍त देऊन प्रकृती सुधारण्यास बळ दिले. यामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. 

तालुक्यातील झरी येथील योगिता  जगाडे (वय 3 वर्षे) ही बालिका आजारी असल्याने तिला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तापीने त्रस्त असलेल्या योगितामध्ये अशक्‍तपणा वाढत असल्याने डॉक्टरांनी तिच्या रक्‍ताची तपासणी करून घेतली.  त्यात तिचा रक्‍त गट ओ पॉझिटीव्ह व रक्‍ताचे प्रमाण हे अत्यल्प 5.5 एम.एल.असल्याचे निष्पन्‍न झाले.

नातेवाईकांनी रक्‍त मिळवण्यासाठी हालचाल सुरू केली परंतु शहरातील दोन खासगी ब्लड बँक व जिल्हा रुग्णालयातील रक्‍तपेढीतही हवे ते रक्‍त संकलित झाले नव्हते. याचवेळी धावपळ करीत रुग्णालयातील कर्मचारी शिवाजी जगाडे(रा.वाडी दमई ता.परभणी)  सदरील मुलीस रक्‍त देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने त्याच्या  गावाकडील मित्र व हरिबाई वरपूडकर डी.फार्मसी येथील दुसर्‍या वर्षात शिकत असलेल्या अमोल लेवडे (रा.वाडी.दमई) यास बोलावून घेतले. त्यांनी रुग्णालयातच डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रत्येकी 350 एम.एल. रक्‍त देऊन योगिताची प्रकृती सुधारण्यास मदत केली.यामुळे योगिताची प्रकृती सुधारली आहे.

ग्रामीण भागातील असल्याने मन हेलावले ः ज्ञानेश्‍वर गायकवाड  

शेतकरी कुटुंबातील योगिता या मुलीला रक्‍ताची आवश्यकता असताना ते मिळू शकत नसल्याचे पाहून मन हेलावले अन् बी.पॉझिटीव्ह असलेल्या गावाकडील मित्रास बोलावून दोघांनी मिळून तिच्यासाठी स्वतःचे रक्‍त दिले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या चेहर्‍यावर भाव बघून आम्हाला समाधान मिळाले.  

आषाढीच्या महिन्यात रक्‍त दिल्याचे समाधान ः अमोल लेवडे

आषाढी एकादशीच्या महिन्यातच रक्‍त देऊन एका बालिकेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मदत केल्याचे समाधान मिळाले. यानंतर कुटुंबीयांनी मानलेल्या आभारामुळे आम्ही दोघेही भारावून गेलो.