Sun, Jul 21, 2019 02:10होमपेज › Marathwada › पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा

Published On: May 03 2018 1:30AM | Last Updated: May 02 2018 9:14PMपरभणी : प्रतिनिधी

जिंतूर शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणावर तब्बल 17 जणांचा चावा घेत गंभीर जखमी केल्याची धक्‍कादायक घटना 1 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. यातील जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता परभणी येथे हलविण्यात आले. एकाच दिवशी झालेल्या या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून न. प. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जिंतूर शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वृद्धी झाली आहे. यातील काही कुत्र्यांना गंभीर स्वरूपाचे आजार जडल्याने कुत्रे पिसाळत आहेत. असाच एक विचित्र अनुभव जिंतूरवासीयांना आला आहे. शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी चिमुकल्या बालकांसह 17 जणांचा चावा घेतला आहे. 

चावा घेतलेल्या 17 जणांना प्राथमिक उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे रेबीजची लस उपलब्ध नसल्याने परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुमाकूळ घालणार्‍या पिसाळलेल्या कुत्र्यास पकडण्याची कुठलीही यंत्रणा जिंतूर नगर परिषदेकडे उपलब्ध नाही. यामुळे हे कुत्रे सध्या मोकाट फिरताना दिसत आहेत. कुत्र्याने चावा घेतलेल्यांमध्ये दीपक अंभोरे 35 वर्षे, आसाराम बालाजी रोकडे 18 वर्षे, दशरथ तनपुरे 18 वर्षे, अल्का सातपुते 14 वर्षेे, शंकर ठोले 50 वर्षे, सुल्लतानखाँ जफरखाँ 20 वर्षे, आलिया शेख याकुब 6 वर्षे, रोहित प्रशांत रोकडे 7 वर्षे, शेख फैजान 14 वर्षे, खलिल अहेमद 6 वर्षे, गोविंद फुला राठोड 7 वर्षे, रावण मोहिते 43 वर्षे, हारुण शेख खुर्शीद 25 वर्षे, सय्यद राफू सय्यद नूर 44 वर्षे, अशोक रामजी खंदारे 50 वर्षे, कुरेशी मरिय्या रशिद 10 वर्षे, पंडित बाबा राठोड 65 वर्षे, शेख रिहान 17 वर्षे या 17 जणांचा यात समावेश आहे. 

हे सर्व जखमी जिंतूर येथील रहिवाशी असून यात तीन बालकांचा समावेश आहे. कुत्र्याच्या या धुमाकुळामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले असून न. प. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

ग्रामीण भागातही पिसाळलेल्या कुत्र्याचा उपद्रव

जिंतूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील वरुड नृसिंह, कोळपा, पुंगळा तांडा, पिंपरी, खरवडी, येलदरी, गडदगव्हाण, वडाळी, पोखर्णी, मालेगाव, ताटापूर, खोलगाडगा, अंबरवाडी, भोगाव, जांब, चिचोली खुर्द, भोसी, मानमोडी, मांडवा, मानधानी, जाब बु, करंजी, हिवरखेडा, सिद्धेश्‍वर, निवळी, ईटोली, पांगरी, अकोली आदी गावांमधील नागरिक पिसाळलेल्या कुत्र्यांचे बळी पडत असून दरदिवशी ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात येत आहे.

जिंतूर ग्रामीण रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा

पिसाळलेले कुत्रे मोकाट असून श्‍वान दंश प्रतिबंधक लस ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही. यामुळे नागरिक सध्या या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत. जिंतूर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी जवळपास शंभराहून अधिक गावांतील नागरिकांची नेहमीच रेलचेल असते. येथे सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय आहे; पण या ठिकाणी साधे पिसाळलेल्या कुत्र्याने जर एखाद्या नागरिकास चावा घेतला तर त्यावर उपचारासाठी रेबीज लस उपलब्ध नसल्याचा उलगडा आरोग्य अधिकार्‍यांनी केला आहे. 

Tags : Parbhani, 17 people, dogs, Bitten,