Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Marathwada › कोट्यावधी महसूल बुडीत

कोट्यावधी महसूल बुडीत

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 12:52AMबीड : शिरीष शिंदे  

ज्या दुकानांमध्ये किंवा व्यापार्‍यांकडे दहा पेक्षा कमी नोकर कामावर असतील त्यांना शॉप अ‍ॅक्ट लायसन्सची गरज नसल्याचा नवीन नियम राज्य शासनाने लागू केला आहे. यामुळे लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र व्यापार्‍यांकडून शॉप अ‍ॅक्टच्या माध्यमातून मिळणारा कोट्यावधीच्या महसूल बुडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आज घडीला 35 हजार दुकाने अस्तित्वात असून त्या पैकी किती दुकानदार शॉप अ‍ॅक्ट परवाना काढतात हे पहाणे औचित्याचे ठरणार आहे.  

शॉप अ‍ॅक्ट कायद्यानुसार, लहान ते मोठ्या दुकानदारांना किंवा व्यापार्‍यांनी शॉप अ‍ॅक्ट लायसन्स काढणे बंधनकारक होते. बँकेचे कर्ज, नवीन एजन्सी घेणे किंवा मोठा माल कंपन्याकडून घेण्यासाठी शॉप अ‍ॅक्ट लायसन्सची विचारणा केली जात होती. सदरील लायसन्स शिवाय बँका व्यापार्‍यांना, दुकानदारांना कर्ज मंजूर करत नव्हत्या.  ज्या दुकानदारांना कर्ज काढायचे नसेल, मोठा आर्थिक व्यवहार नसेल ते शॉप अ‍ॅक्ट लायसन्स शिवाय दुकान चालवित असल्याचे यापूर्वी अनेक वेळा समोर आले आहे, परंतु जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात कर्मचारी कमी असल्याने बहुतांश वेळा कारवाई होत नव्हत्या, मात्र हा नियमात बदल झाल्याने लहान व्यापार्‍यांना दिलासा मिळाला आहे.