Mon, Apr 22, 2019 12:04होमपेज › Marathwada › बीडच्या कुस्तीपटूची मेरठमध्ये बाजी

बीडच्या कुस्तीपटूची मेरठमध्ये बाजी

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 21 2018 10:59PMबीड : दिनेश गुळवे

घरचे अठरा विश्‍व दारिद्र्य... ना शरीरयष्टीसाठी खुराक ना तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला... अशा समान्य परिस्थितीतील मुलाने उत्तर प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्रांझ पदक पटकावले. वडिलांनी हमाली काम करीत मुलांचे पालन-पोषण करून कुस्तीचे धडे दिले. मुलाने आंतरराष्ट्रीय कुस्तीत यश मिळावे, या स्वप्नासाठी ही वडिलांची खटाटोप सुरू आहे. 

बीड जवळील तळेगाव येथील भागवत काकडे यांची हलाखीची परिस्थिती असून, घरी अवघी दोन ते अडीच एकर जमीन आहे. अशा परिस्थितीही त्यांनी बीड येथे हमाली काम करून आपल्या मुलांना घडविले. मुलांना खेळाडू करायचे, ही भागवत काकडे यांची इच्छा असल्याने त्यांनी मुलगा दिनेश काकडे यास लहानपणापासूनच कुस्ती, खो-खो, मल्लखांब आदी खेळाचे बाळकडू दिले. त्यामुळे दिनेश अवघा दहा वर्षांचा असताना बीड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या पाच कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत दुसरा आला होता. या स्पर्धेत त्यास भागही घेतला जाऊ दिला जात नव्हता, मात्र विनंती केल्याने प्रवेश मिळाला . वडील भागवत यांच्यासह महादेव शिंदे, इसाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश काकडे याने सराव केला. 2016 मध्ये त्याची सैन्य दलाच्या पुणे येथील बाईज स्पोर्ट कंपनीमध्ये निवड झाली. येथेही त्याने आपल्या खेळाची चुणक दाखविल्याने त्याची 2017 मध्ये मेरट येथील सेंटरमध्ये निवड करण्यात आली. दिनेश काकडे हा सध्या मेरट येथे शिक्षणासह सराव करत आहे. 

नुकतीच बरेली (उत्तरप्रदेश) येथे राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये देशातील बाईज स्पोर्ट कंपनीमधील 15 वर्ष आतील गटाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत दिनेश काकडे याने ब्रांझ पदक मिळविले आहे. मार्गदर्शक आणि वडिलांच्या मेहनतीमुळे आपण हे यश मिळविल्याचे दिनेश काकडेने सांगितले. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले. 
येत्या ऑगस्टमध्ये या स्पर्धांसाठी निवड चाचणी आहे. यात आपण उत्तीर्ण होऊ, असा विश्‍वासही त्याने व्यक्त केला आहे. या यशाबद्दल त्याचे आई-वडील, भाऊ, मार्गदर्शक, शिक्षक यांनी कौतुक केले आहे.

अनेक स्पर्धा गाजविल्या 

दिनेश काकडे याने बीड येथे अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. यांसह क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद अकोला येथे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक, इंटर बीएससी टुर्नामेंट 2016 प्रथम, पुणे जिल्हा मुष्टियुद्ध स्पर्धेत प्रथम, कै. रमेश दामले स्मृती स्पर्धा या स्पर्धेतही त्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.