Sat, Dec 14, 2019 04:36



होमपेज › Marathwada › बीडच्या डॉक्टरांनी पूरग्रस्तांसाठी पाठवली साडेचार लाखांची औषधे 

बीडच्या डॉक्टरांनी पूरग्रस्तांसाठी पाठवली साडेचार लाखांची औषधे 

Published On: Aug 13 2019 5:14PM | Last Updated: Aug 13 2019 4:46PM

संग्रहित छायाचित्र



बीड : प्रतिनिधी

सामाजिक उपक्रमांबरोबरच आपत्तीग्रस्तांच्या मदतीला कायम धावून येणाऱ्या बीडच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने पूरग्रस्तांसाठी साडेचार लाख रुपयांची औषधे दिली आहेत. मंगळवारी सकाळीच औषधांनी भरलेली गाडी कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली आहे.

सांगली, कोल्हापूर येथे पूर आल्यानंतर बीड जिल्ह्यातून मोठया प्रमाणात धान्य, कपडे व इतर साहित्याच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. सामाजिक उपक्रमात कायम अग्रेसर असलेल्या बीडच्या आयएमए संघटनेनेही या मदतीसाठी पुढाकार घेतला. कोल्हापूर आयएमएकडून औषधांची मागणी होताच बीडची संघटना एकत्र आली आणि अवघ्या काही तासांत साडेचार लाख रूपयांची औषधे जमा केली. जीवनावश्यक औषधांनी भरलेली गाडी मंगळवारी सकाळीच कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहे. ही मदत कोल्हापूर आयएमएकडे सुपूर्द केली जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल यांनी सांगितले. यादरम्यान यातील ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत ही राज्य आयएमएकडे पाठविण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, आयएमए बीडचे अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल, डॉ. अनुराग पांगरीकर, डॉ. विनोद ओस्तवाल, डॉ. सी. ए. गायकवाड, डॉ. अविनाश देशपांडे, डॉ. सुशांत योगे, डॉ. राजेश शिंदे, डॉ. अनंत मुळे, डॉ. सुनिता बारकुल, डॉ. डिंपल ओस्तवाल, डॉ. जयश्री घुगे, डॉ. रिता शहाणे, डॉ. प्रज्ञा तांबडे आदींची यावेळी उपस्थिती होती.