Fri, Apr 19, 2019 12:45होमपेज › Marathwada › भगवानगडावर पंकजा मुंडे-नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर 

भगवानगडावर पंकजा मुंडे-नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर 

Published On: Apr 05 2018 6:45PM | Last Updated: Apr 05 2018 6:45PMबीड : प्रतिनिधी

श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक, श्री संत भगवानबाबा यांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाची सांगता महंत न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव शास्त्रीजी काल्याच्या कीर्तनाने व नामदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाली. सप्ताहाच्या समारोपा प्रसंगी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ.विनायक मेटे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, सामाजिक कार्यकर्त्या सुशीताताई मोराळे, समाजसेवक रविंद्र क्षीरसागर यांनी देखील भेट दिली.

 शिरूर कासार तालुक्यातील मौजे तागडगांव या ठिकाणी श्री क्षेत्र भगवानगडाचा ८५ वा नारळी अखंड हरिनाम सप्ताह सपन्न झाला. २९ मार्चला प्रारंभ झालेल्या या सप्ताहामध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न झाली. दररोज दुपारी ठीक तीन ते सहा या वेळेमध्ये रामायणाचार्य ह.भ.प.श्री. रामराव महाराज ढोक यांची सुश्राव्य अशी श्री रामकथा संपन्न झाली. दरवर्षी प्रमाणे काल्याच्या किर्तनासह आदल्या दिवशीही श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे अमृततुल्य कीर्तन संपन्न झाले.

भगवानगड भाषणमुक्त झाल्यामुळे श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत न्यायाचार्य श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी यावर्षी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना भगवानगडाच्या नारळी सप्ताहाचे स्टेज खुले केले होते. त्यामुळे सप्ताहाच्या सुरूवातीला विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे व खासदार प्रीतम मुंडे, माजी आमदार सुरेश नवले, संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित राहून श्री संत भगवानबाबा व महंत श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे आशीर्वाद घेतले होते. सप्ताहाच्या मध्यंतरी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी सप्ताहाला भेट देऊन बाबांचा आशीर्वाद घेतला. काल काल्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या ग्रामविकासमंत्री नामदार पंकजा मुंडे यांची सप्ताहामध्ये प्रमुख उपस्थिती होती. त्या स्टेजवर आल्याबरोबर त्यांनी श्रीगुरु नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या चरणावर माथा ठेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्या म्हणाल्या की, परक्यांनी आपल्यावर आक्रमण करू नये हेच आपले ध्येय असल्यामुळे घरातील वादामध्ये मी माघार घेण्यास तयार आहे. श्री संत भगवानबाबा व महंत गुरूवर्य श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी हे आपले गुरु आहेत; आपण त्यांचे भक्त आहोत. त्यांच्या आशीर्वादानेच आपण आपली वज्रमूठ कायम ठेऊ.

तर काल्याच्या किर्तनामध्ये बोलताना गुरूवर्य नामदेव महाराज शास्त्रीजी म्हणाले की, सर्वच भगवानगडाचे भक्त असल्यामुळे सर्वांनाच गडाचे आशीर्वाद आहेत. सर्वांनी मोठं व्हावं, समाजसेवा करावी  हीच भगवानगडाची भावना आहे. यावेळी सुमारे दोन लाख भाविक उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनानंतर सर्व भाविकांना श्री संत भगवानबाबांचा महाप्रसाद देण्यात आला व त्यानंतर सप्ताहाची सांगता झाली.