होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांना बसणार आर्थिक फटका

शेतकर्‍यांना बसणार आर्थिक फटका

Published On: Mar 01 2018 1:34AM | Last Updated: Feb 28 2018 11:29PMबीड : प्रतिनिधी 

कापसाची सरासरी उत्पादकताच कमी दाखविण्यात आल्याने पीक कापणी प्रयोगात आलेली प्रत्यक्ष उत्पादकता आणि सरासरी उत्पादकतेमधील तफावत कमी झाली. त्यामुळे, अनेक मंडळांमध्ये नुकसान 33% पेक्षा कमी झाल्याने नोंदविले गेले. परिणामी, जिल्ह्यातील 43 महसूल मंडळातील कापूस उत्पादक अनुदानापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यात सर्वसाधारणपणे एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस घेतला जातो. काही ठिकाणी ही उत्पादकता यापेक्षाही जास्तीची आहे. याचा अर्थ हेक्टरी 20 ते 30 क्विंटल कापूस बीड जिल्ह्यात घेतला जातो. बीटीचा वापर सुरू झाल्यानंतर कापसाची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढली होती. प्रत्यक्षातील स्थिती ही असली तरी कागदावरचे चित्र मात्र वेगळे आहे.

बीड जिल्ह्यात कापसाची सरासरी उत्पादकता दाखविताना कृषी विभागाने कंजुशी केली. जिथे बीड तालुक्यात राजुरी महसूल मंडळात सर्वाधिक म्हणजे हेक्टरी 4.9 क्विंटल सरासरी उत्पादकता दाखविण्यात आली आहे. माजलगावमध्ये गंगामसला महसूल मंडळात हेक्टरी 6.39 क्विंटल  सरासरी उत्पादकता दाखविण्यात आली. शिरूरमध्ये मात्र रायमोहा सारख्या महसूल मंडळात हिच सरासरी उत्पादकता अवघी 2.94 क्विंटल दाखविण्यात आली. याच महसूल मंडळात पीक कापणी प्रयोगातील प्रत्यक्ष उत्पादन 4 क्विंटलच्या आसपास नोंदविण्यात आली आहे. यामुळे बोंडअळीचा फटका बसला असला तरी येथील उत्पन्न सरासरी उत्पादकतेपेक्षा जास्त दिसत आहे. म्हणून बोंडअळीच्या मदतीपासून हे महसूल मंडळच वगळण्यात आले.