होमपेज › Marathwada › बारावी निकालात जिल्हा तिसरा

बारावी निकालात जिल्हा तिसरा

Published On: May 31 2018 1:40AM | Last Updated: May 30 2018 10:49PMबीड : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.30)  जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील 37 हजार 556 विद्यार्थ्यांपैकी 33 हजार 455 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल 89.08 टक्के लागला आहे. राज्याप्रमाणेच बीड जिल्ह्यातही मुलीच बेस्ट ठरल्या असून 91.34 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 87.75 टक्के आहे. औरंगाबाद विभागातून या वर्षी बीड जिल्हा तिसर्‍यास्थावर आला आहे.

गतवर्षी जिल्ह्याचा निकाल 90.49 टक्के इतका लागला होता. यंदा जिल्ह्याच्या निकालात 1.41 टक्क्यांनी घट झाली असून, विज्ञान शाखेचा सर्वाधिक 95.64 टक्के इतका निकाल लागला आहे. या खालोखाल वाणिज्य शाखेचे 88.51 टक्के तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा 82.62 टक्के व कला शाखेचा सर्वात कमी 80.59 टक्के निकाल लागला आहे. फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 37 हजार 662 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. यापैकी 37 हजार 556 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 33 हजार 455 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 89.08 टक्के इतका लागला आहे.

यामध्ये 20 हजार 782 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर जिल्ह्यात 12 हजार 673 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. 4101 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.34 टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 87.75 टक्के आहे. जिल्ह्यात 11 तालुक्यात बीड तालुक्याचा सर्वाधिक 91.41 टक्के इतका निकाल लागला आहे. गतवर्षीही जिल्ह्यात बीड तालुक्याचाच सर्वाधिक 92.62 टक्के इतका निकाल लागला होता. यंदा केज तालुक्याचा 90.79 टक्के निकाल लागला आहे, तर शिरूर तालुक्याने जिल्ह्याच्या निकालात 89.87 टक्के निकाल मिळवत तृतीय स्थान मिळवले आहे. 

यंदा निकाल घसरला

औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्याचा सर्वाधिक 89.90 टक्के इतका लागला असून, त्या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्याचा 89.15 टक्के, तर विभागातील जालना जिल्ह्याचा 87.45 टक्के व हिंगोली जिल्ह्याचा 86.40 टक्के इतका निकाल लागला आहे. बीड जिल्ह्यातील 37 हजार 272 मुला-मुलींनी बारावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती.  गेल्या पाच वर्षांपासून औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागला होता. यंदा मात्र बीड जिल्हा बारावी परीक्षेच्या निकालात विभागात तिसर्‍या स्थानावर गेला आहे.