Mon, Jan 21, 2019 03:25होमपेज › Marathwada › परिस्थितीवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार करा ; डॉ. लहाने

परिस्थितीवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार करा ; डॉ. लहाने

Published On: Feb 20 2018 1:53AM | Last Updated: Feb 20 2018 1:46AMबीड  ; प्रतिनिधी

कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या सकारात्मक विचारांमुळे तुम्ही कोणतीही परिस्थिती बदलवू शकता, असे प्रतिपादन प्रख्यात सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले.  सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड. डी. बी. बागल, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. विजय पवार, उपाध्यक्ष फारूख पटेल, प्राचार्य गणेश डोंगरे आणि अभय पटवारी आदींची उपस्थिती होती.

आपल्या खास शैलीत डॉ. विठ्ठल लहाने यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्याही नियोजनाशिवाय आपले जीवन घडू शकत नाही. त्यासाठी आपण काय करायचे आहे आणि काय नाही याचे नियोजन करा आणि जीवनात यशस्वी व्हा असे डॉ.लहाने म्हणाले. अभय पटवारी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शहर व परिसरातील तरुणांची मोठी उपस्थिती होती.