गेवराई : विनोद नरसाळे
तालुक्यातील पांढरवाडी येथील अल्पवयीन दोन बहिणींचे विवाह रोखण्यात तलवाडा पोलिसांना यश आले. एका खबर्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी १ वा. सुमारास ऐन विवाहाप्रसंगी पोलिसांनी लग्न मंडपात एंट्री केली व सुरू असलेले विवाह थांबवले. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीसह ग्रामस्थांच्या नेमका प्रकार लक्षात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे एक शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहे. येथील एका कुटुंबातील दोन अल्पवयीन बहिणींचा विवाह तालुक्यातीलच सिरसमार्ग येथील दोन सख्खे भाऊ असलेल्या मुलांशी ठरला होता. बुधवारी विवाहाचा मुहूर्त काढून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विवाह पार पाडण्याच्या हेतूने सर्व तयारी झाली होती.
दरम्यान, तलवाडा पोलिसांना पांढरवाडी येथे दोघा बहिणींचा बालविवाह सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविणकुमार बांगर, पोलिस उपनिरीक्षक तडवी, सागळे, रहाटवार, मिसाळ, गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्यांनी पांढरवाडी येथे धाव घेऊन संबंधित बालविवाह थांबविले. यानंतर पोलिसांनी वऱ्हाडींचे समुपदेशन केल्यानंतर नातेवाईकांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
Tags : beed, child marriage, police