Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Marathwada › सावधान ! शहरात होतोय दूषित पाणी पुरवठा

सावधान ! शहरात होतोय दूषित पाणी पुरवठा

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 1:04AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावर मागील काही दिवसांपासून पाणी शुद्ध करणार्‍या औषधींचा वारंवार तुटवडा निर्माण होत आहे. त्याचा परिणाम आता शहरातील पाणी पुरवठ्यावर होऊ लागला आहे. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सावधान... कदाचित तुम्ही पीत असलेले पाणीही दूषित असू शकते. दूषित पाणीपुरवठ्याच्या वाढलेल्या तक्रारीनंतर कोठे मनपा प्रशासनाला जाग आली आहे. शुक्रवारी तातडीने मनपाने शहरातील 13 जलकुंभांचे पाणी नमुने तपासणीसाठी छावणीच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. 

 मनपाच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर रासायनिक औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याचे सत्य सर्वप्रथम दैनिक पुढारीने उजेडात आणले होते. त्यानंतर मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारींचा ओघ मनपाकडे सुरू झाला. या संबंधित विविध वॉर्डातील नागरिक आणि नगरसेवकांनीही महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडेही अनेक तक्रारी केल्या. परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसत असल्याने महापौरांनी इतर पालिका पदाधिकार्‍यांसमवेत गुरुवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. त्यावेळी केंद्रातून शहराकडे येणारे पाणी हे शुद्ध असल्याचे प्रयोगातून पालिका अधिकार्‍यांनी दाखविले.

मात्र, शहरातील काही भागात गॅस्ट्रोची समस्या सुरू झाल्याने पाणी शहरातच दूषित होत असल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे. त्यामुळे शहरभरातील तेरा जलकुंभांवरील पाण्याचे नमुने तपासणीसाठी छावणी येथील फॉरेन्सिक लॅबकडे  पाठविण्यात आले आहेत. या पाण्याची तपासणी करून येत्या दोन दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहे. तसेच यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने शुक्रवारी(दि.6) शहरातील मनपाच्या 13 जलकुंभ व संपातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी छावणी येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले. फारोळा केंद्रातून आणलेले पाण्याचे दोन नमुनेही तपासणीसाठी देण्यात आले आहे.

Tags : Aurangabad, careful,Infectious, water supply, city