Mon, Aug 19, 2019 17:32होमपेज › Marathwada › सुट्यांमुळे बँका बंद, एटीएममध्ये खडखडाट

सुट्यांमुळे बँका बंद, एटीएममध्ये खडखडाट

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 10:30PMबीड : प्रतिनिधी

एकीकडे विवाह समारंभासाठी खरेदीची धूम सुरू असतानाच दुसरीकडे बीड शहरातील अनेक एटीएममध्ये सोमवारी खडखडाट होता. यामुळे शहरात खरेदीच्या मनसुब्याने आलेल्या ग्राहकांच्या आशेवर पाणी पडले. कोणत्या एटीएममध्ये रक्कम असेल हे धुंडाळता-धुंडाळता ग्राहकांच्या नाकीनव आले होते. 

सध्या लग्न सराई सुरू असल्याने बाजारपेठेत ग्रामीण भागातून व शहरातूनही अनेक ग्राहक खरेदीसाठी येतात. अशा खरेदीच्या मूडने शहरात आलेल्या ग्राहकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 

सोबत अधिक नोटा बाळगण्याऐवजी एटीएम वापरणे सोईस्कर असल्याने त्याचा वापर वाढला आहे, मात्र चार दिवस बँकांना सुटी असल्याचा मोठा फटका रकमेऐवजी केवळ एटीएम बाळगणार्‍यांना बसला. बीड शहरातील स्टेडिअम परिसर, मोंढा रोड, जालना रोड, नगर रोड, पेठ बीड या भागात मोठ्या प्रमाणावर विविध बँकांचे एटीएम आहे. यातील जवळपास सर्वच एटीएम मशीमध्ये सोमवारी कॅश नव्हती. काही जण सुभाष रोडवरून जालना रोडवरील एटीएममध्ये जात होते, तर काही जण बसस्थानकासमोरील एटीएम, स्टेडिअम परिसरातील एटीएम येथे खेटे मारत होते, मात्र या एटीएमवर पैसे नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.  

स्वॅप मशीन वापरण्यास टाळाटाळ

नोटाबंदीच्या काळात अनेक व्यापार्‍यांनी स्वॅप मशीन खरेदी केले. काही दिवस नागरिकांनी या स्वॅप मशीनचा वापरही केला, मात्र या स्वॅप मशीनवर काही व्यापारी अधिकचे पैसे घेत असल्याची ओरड नागरिकांतून होती. त्यामुळे नंतरच्या काळात ही मशीन वापरणेही ग्राहकांनी टाळले आहे. दुसरीकडे या मशीनवरील व्यवहार उघड होत असल्याने काही व्यापार्‍यांनी मशीन टाळणे पसंत केले आहे. अशा परिस्थितीमुळे ग्राहकांना खरेदीसाठी अधिकच अडचणी आल्या आहेत. शनिवार, रविवार, सोमवार व मंगळवार अशा सलग चार सुट्या आहेत. त्यामुळे एटीएममधील कॅश संपली आहे. मंगळवारीही सुटी असल्याने एटीएममध्ये रक्कम असेल का याची काळजी आता सर्वसामान्यांना लागली आहे.  

Tags : Beed, Banks shut off due to holiday ,No money, ATM,