होमपेज › Marathwada › बँक-महामंडळाच्या तांत्रिकतेमुळे लाभार्थी वंचित

बँक-महामंडळाच्या तांत्रिकतेमुळे लाभार्थी वंचित

Published On: Mar 07 2018 2:44AM | Last Updated: Mar 07 2018 2:23AMपरभणी  : प्रदीप कांबळे

महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडे दोन वर्षांत 430 कर्ज प्रकरणे दाखल झाली. मात्र अवघ्या 60 लाभार्थ्यांनाच बँकांकडून बीज भांडवल व विशेष घटक अनुदान योजनेचे अर्थसहाय्य मिळाले. सुमारे 370 लाभार्थी 2 वर्षांपासून या महामंडळाच्या कार्यालयात खेटे मारून वैतागले आहेत.  प्रस्तावित पात्र लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत होते. यासाठी नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणार्‍या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव समितीच्या मंजुरीने बँकांकडे जातात. जिल्ह्यात विशेष अर्थसहाय्य अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज दिल्या जात आहे. मात्र  बँका व महामंडळाच्या तांत्रिकतेमध्ये अडकलेल्या लाभार्थ्यांना खेटे मारावे लागत आहेत.

 2016-2017 मध्ये  शासनाकडून जिल्ह्यातील 33 बँकांच्या शाखांना एकूण 210 लाभार्थ्यांना कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले. यात पाठविलेल्या  195 पैकी 90 लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांनी परत पाठविले. या आर्थिक वर्षात बँकांकडे प्रलंबित कर्ज प्रकरणांची संख्या 143 इतकी आहे. 2018 मध्ये विशेष घटक योजनेत एकूण 257 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट बँकाना दिले असून  यापैकी 70 लाभार्थ्यांना बँकांनी अपात्र ठरविले आहे. या वर्षात बँकांनी केवळ 24 लाभार्थ्यांना कर्ज दिले आहे. बीज भांडवल कर्ज योजनेत एकूण 255 लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित असून यावर्षी 100 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र नाममात्र लाभार्थ्यांना कर्जाचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.