Mon, Nov 19, 2018 16:51होमपेज › Marathwada › डाळिंब लागवडीतून तांबिले लखपती 

डाळिंब लागवडीतून तांबिले लखपती 

Published On: Aug 05 2018 1:30AM | Last Updated: Aug 05 2018 1:30AMसेनगाव : जगन्नाथ पुरी

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील युवा शेतकर्‍याने पारंपरिक पिकांना फाटा देत दोन एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेण्यात यशस्वी झाले आहेत. सध्या त्यांच्या बागेतील डाळिंबाच्या झाडाला अर्धा किलोचे एक-एक फळ लागले असून यातून त्यांना 75 टन उत्पन्न अपेक्षीत असून दहा लाखांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

तालुक्यातील वाघजाळी येथील युवा शेतकरी बालाजी तुकाराम तांबिले यांच्याकडे वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. दरवर्षी ते पारंपारिक पिके घेतात. त्यांनी शेतात डाळिंबाची बाग करण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी अनेक शेतकर्‍यांच्या बागा पाहिल्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठातून कुटी जातीचे डाळिंबाचे चारशे झाडे आणली. त्याची बारा बाय आठ या पद्धतीने लागवड केली. त्यांचे विहीर असलेले शेत डाळिंबाच्या शेतापासून एक ते दीड किलोमीटर लांब आहे. 

तसेच दुसरे एक शेत गावाजवळ असून त्याचे अंतर देखील तेवढेच आहे. या दोन शेतात पाण्याची व्यवस्था असल्याने डाळिंबाच्या बागेला पाणी देण्यासाठी जलवाहिन्या टाकून कृषी विभागाकडून शेततळे केले आहे. या तळ्यातून ते डाळिंबाच्या बागेला पाणी देतात. लागवडीनंतर दोन वर्षांनंतर त्यांना उत्पन्न सुरू झाले. पहिल्या वर्षी साठ टन उत्पन्न झाले. तर मागच्या वर्षी त्यांना अठरा टन डाळिंब झाले.

त्यांच्या विक्रीपासून खर्च वजा करता निव्वळ सात लाखांचे उत्पन्न झाले आहे. त्यांनी जागेवरून त्याची नाशिक येथील आयएनआय या कंपनीला विक्री केली आहे. यावर्षी त्यांची डाळिंब एकाचे वजन 6.50 ग्राम आहे. यासाठी त्यांनी आतापर्यंत खताची मात्रा, औषध, मजुरी व आता काही दिवसानंतर तोडणीचा होणारा खर्च असे गृहीत धरून दीड लाख रुपये खर्च झाला आहे. 

यावर्षी त्यांच्या बागेत 75 टन उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी त्यांना भाव देखील चांगला मिळणार असून नुकतीच आयएनआय कंपनीतर्फे पाहणी करण्यात आली असून खर्चाला जाता दहा लाख उत्पन्न अपेक्षित असल्याचे तांबिले यांनी सांगितले.