Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Marathwada › गटारांमधील कचर्‍यामुळे शहराला दुर्गंधीचा विळखा

गटारांमधील कचर्‍यामुळे शहराला दुर्गंधीचा विळखा

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:45PMपरभणी : प्रतिनिघी

शहरातील स्वच्छतेवर कठोर नियमांची अंमलबजावणी करत असलेल्या महानगरपालिका प्रशासनाने शहरातील कचरा व्यवस्थापनही सुरळीत केले. मात्र शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा हा आजही सांडपाणी जाणार्‍या नाल्यांमध्ये टाकण्यात येतो. यामुळे कचरा वर्गीकृत करून त्याचे विघटन घडवून आणणार्‍या प्रकल्पात अडथळा निर्माण होईल याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु नाल्यांमधून निघालेल्या गाळरूप कचर्‍यांने मात्र डंपिंग ग्राउंड परिसरातील नागरिकांच्या समस्या कायम राहतील अशी स्थिती निर्माण होणार आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून संपुर्ण शहराच्या दुर्गंधीयुक्‍त कचर्‍यांच्या ढिगारांमध्ये वास्तव्यात असलेल्या या परिसरातील हजारो कुटुंबांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागले आहे, परंतु यावर उपाययोजना करण्याऐवजी मनपाने याच जागेवर विविध प्रकारच्या युक्त्या वापरणे सुरु केले आहे. मनपा प्रशासनातील स्वच्छता कर्मचार्‍यांच्या डोळ्यादेखत व्यापारी व नागरिक नाल्यांमध्ये कचरा टाकून नियमभंग करतात. नाल्यांमध्ये पडलेला कचरा हा उपसा करतेवेळेस गाळाच्या स्वरुपात बाहेर पडतो. या प्रकारचा कचरा, गाळ हा धाररोडवरील डंपिंग ग्राउंडवर नेऊन जमा केला जात असल्याने या परिसरात मोठ-मोठे गाळाचे व कचर्‍याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. शहरातील मोठ-मोठ्या गटारांमध्ये पडलेल्या कचर्‍यांचे संकलन करण्याकडे मनपाचे लक्ष नसून त्यांची विल्हेवाट करण्याचा विचारही प्रशासन करत नसल्याने शहरातील मोठे गटार कोंडलेल्या स्थितीत पाहायला मिळत आहे.

निरज हॉटेल ते बसस्टॅन्ड रोडलगतच्या गटारामध्ये डॉक्टर लाईनचा सर्व कचरा पडतो. बाजारपेठ परिसरातील व्यापारी दुकानात कचरा संकलन करण्याऐवजी तो नाल्यांमध्ये टाकतात. खानावळी चालकही टाकाऊ अन्न व  इतर कचरा घंटागाड्यांमध्ये टाकण्याऐवजी अधिक प्रमाणात नाल्यांचाच वापर करत आहेत. यामुळे शहरातील गटारांची व नाल्यांची अवस्था दयनीय झाली असून सांडपाण्याचे वहन होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. मनपाने शहरातील गटारे स्वच्छ न केल्यास शहरात दुर्गंधी पसरून साथीच्या रोगांची लागण होईल अशी भीती  निर्माण झाली आहे.  त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यालगत व वसाहतींमध्ये असणार्‍या छोट्या-छोट्या नाल्या देखील कचरा मुक्‍त कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. 

Tags : Marathwada, Bad smell, city, due, Drainage line