Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Marathwada › त्या नवजात बाळाची होणार डीएनए चाचणी

त्या नवजात बाळाची होणार डीएनए चाचणी

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 11:28PMबीड : प्रतिनिधी 

जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कथीत बाळ बदली प्रकरणातील गाेंंधळ दुसर्‍या दिवशीही कायमच होता. बाळाच्या नातेवाइकांची आम्हाला मुलगा झाला होता, रुग्णालय मुलगी देत असल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आता त्या नवजात बाळाची डीएनए चाचणी होणार आहे.

छाया व राजू थिटे (रा.हिंगोली ह.मु.कुप्पा ता.वडवणी) हे दाम्पत्य कामासाठी मागील सात महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात वास्तव्यास आहे. 11 मे रोजी छाया यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी 4.45 वा. छाया यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु वजन केवळ 1 किलो 500 ग्रॅम असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवले. त्यानंतर बीडच्या जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या त्या बाळास उचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या बाळाला सुटी देताना आम्हाला मुलगा झाला होता, मात्र रुग्णालय मुलगी देत असल्याचा आरोप करत बाळाच्या नातेवाईकांनी बाळ ताब्यात घेण्यास नकार दिला. रुग्णालयात बाळ बदली झाल्याने हा गोंधळ दुसर्‍यादिवशी देखील कायम होता. 

यापार्श्वभूमीवर बाळाची डीएनए तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. पोलिसांनी बाळाशी संबंधित सर्व कागदपत्रे जिल्हा आणि खासगी रुग्णालयातून ताब्यात घेतली आहेत तसेच बाळाच्या पायाचे ठसे तपासणीसाठी पाठवले आहेत. दुरीकडे बीडमधील बालरोगतज्ञांनी मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची भेट घेतली आणि बाळाला जिल्हा रुग्णालयाने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली. डीएनए तपासणीचे निष्कर्ष यायला किमान 8 दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सकांची भूमिका

जिल्हा रुग्णालयात सर्वत्र मुलगा अशीच नोंद आहे, मात्र अजूनही आम्ही नोंद घेताना लिंग ओळखण्यात काही चूक झाली का? याबाबत माहिती घेत आहोत. या बालकाची डीएनए तपासणी झाली तर सार्‍या गोष्टी स्पष्ट होतील, आम्ही पोलिसांना तसे सांगितले आहे अशी भूमिका जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी घेतली आहे.

आईच्या मायेपासून बाळ दूर

खासगी रुग्णालयातील त्या बाळाला खासगी रुग्णालयाने डिस्चार्ज देण्याची तयारी केली आहे. डीएनए तपासणी झाली तरी किमान 8 दिवस अहवाल येणार नाही. अपुर्‍या दिवसाचे, अशक्त बाळ सांभाळायचे कोणी असा प्रश्न असून सध्या हे निरागस बाळ आईच्या मायेपासून दूर आहे. पोलिसांनी ते बाळ ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयास द्यावे, आम्ही उपचार करू अशी भूमिका जिल्हा शक्य चिकित्सकांनी घेतली आहे. उपचारानंतर पालक स्वीकारणार नसतील तर त्या बालकाचा ताबा बालकल्याण समितीला दिला जाईल अशी माहिती आहे. 

अंदाजांना उधाण

जिल्हा रुग्णालयात त्या बाळाने जन्म घेतला त्या वेळी बाळाच्या पायाचे ठसे, रजिस्टरवरच्या नोंदी, डिस्चार्ज देताना नातू स्वीकारला असल्याची अजोबाने घेतलेली नोंद या सर्वबाबी ते बाळ पुरुष जातीचे होत असे दर्शविते, मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये चुकीची नोंद झाल्यास पुढील सर्व ठिकाणी चुका होणे ग्राह्य धरले जाऊ शकते. खासगी रुग्णालयात बाळ बदली होऊ शकते की नाही यावर चर्चा करण्यात येत आहे, तसेच मुलगी असल्यामुळे हा बनाव तर नाहीना या बाजूने पोलिस तपास करत आहेत.

बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे

जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात बाळ बदलले जाण्याची शक्यता अत्यंत कमी असते, मात्र सदरचे बालक 30 आठवड्यांचे (प्री टर्म) असल्याने प्रसूती नंतर लिंग निश्चिती करताना गडबड होऊ शकते असे अनेक बालरोग तज्ञांचे म्हणणे आहे.