Sat, Apr 20, 2019 08:45होमपेज › Marathwada › भाजप कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत करावेत

भाजप कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत करावेत

Published On: Jun 25 2018 1:48AM | Last Updated: Jun 24 2018 11:10PMपरभणी : प्रतिनिधी

राज्य सरकारने साडेतीन वर्षांच्या काळात जलयुक्‍त शिवारसारख्या योजना राबवून कृषी व्यवसायांसह गोरगरीब, अल्पसंख्याक, दलित यांच्यासाठी योजना सुरू करून लाभ मिळवून दिला.  सरकारने केलेले हे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी देशात भाजपने बूथ सक्षमीकरण अभियान राबविले असून बूथ कार्यकर्त्यांनी पक्ष पदाधिकारी बूथ सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे  मार्गदर्शन राज्याचे महसूल व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 

येथील वसमत रोडवर असलेल्या श्रीकृष्ण गार्डन येथे परभणी विधानसभा बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, उपाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यातर्फे करण्यात आले होते. मंचावर भाजपचे मराठवाडा विभागप्रमुख भाऊराव देशमुख, आ.मोहन फड, माजी आ. विजय गव्हाणे, गणेशराव रोकडे, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय चाटे,  युवा नेत्या मेघनाताई बोर्डीकर, विठ्ठल रबदडे, प्रमोद वाकोडकर, दीपाताई रिझवाणी, पालमचे उपनगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, राजेश देशपांडे, मंगलाताई मुदगलकर, रितेश जैन, शिवाजी भरोसे, विलास लुबाळे, दिनेश नरवाडकर, अ‍ॅड.रमेश गोळेगावकर उपस्थित होते. आयोजक आनंद भरोसे, सुरेश भुमरे यांनी मान्यवरांचा काठी व घोंगडे तसेच पुष्पहार देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी परभणी विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथ सक्षमीकरण करावे. जर युती झाली तर परभणीची जागा भाजपला सोडण्यात यावी, परभणीस विभागीय आयुक्‍तालय करण्यात यावे, झरी व राहटी येथील पुलांवर बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, साधारणपणे 300 बूथची विधानसभा असते. प्रत्येक बूथवर एक हजार एवढे मतदान असते. त्यामुळे भाजपच्या विजयासाठी बूथचे सक्षमीकरण होणे महत्त्वाचे आहे. बूथप्रमुखांनी सरकारची कामे तळगळापर्यंत पोहचवून भाजपला मते पडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. यासाठी पक्षाने त्यांना ओळखपत्र, गाडीला स्टीकर्स त्याचबरोबर प्रसार-प्रचार साधनांचे वाटप करावे असे सांगितले. 

प्रदेशाध्यक्ष खा.दानवे यांनी कार्यकर्त्यांनी पक्षसंघटन वाढवावे. सरकार किती चांगले आहे हे जनतेपर्यंत पोहचवावे. यासाठी जिल्हा पदाधिकार्‍यांनी बूथ प्रमुखांसह इतर प्रमुखांच्या नियुक्त्या करून पक्षाचे कार्य, संघटन वाढवावे असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.सुनील तुरुकमाने तर आभार संजय शेळके यांनी मानले. यावेळी शाहीर भारत मुंजे यांनी गीतांतून मनोरंजन केले.