होमपेज › Marathwada › भाजपचे निष्ठावंत पडले अडगळीला?

भाजपचे निष्ठावंत पडले अडगळीला?

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:47PMपरभणी : दिलीप माने 

जनसंघापासून ते भाजप वाढविण्याचे काम व कधी ना कधी देशावर भाजपची सत्ता येईल, या आशेने अहोरात्र प्रयत्न करून भाजपला तळागाळापर्यंत व जिल्ह्यासारख्या ठिकाणी जिवंत ठेवण्याचे काम ज्या निष्ठावंतांनी केले ते खरे निष्ठावंत आज जिल्ह्यात अडगळीला पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इतर पक्षातून भाजपत प्रवेश करून आज हेच भाजप निष्ठावंत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार येऊन तब्बल 4 वर्षे झाले. तर आगामी निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. मात्र खरे निष्ठावंत आता पक्षात कार्य करताना दिसत नाहीत. तर काहीजण पक्षश्रेष्ठी कधी ना कधी आपली दखल घेऊन छोटे-मोठे पद देईल अशी आशा बाळगून आहेत. परभणी जिल्हा तसा भाजपचा अस्तित्व नसलेला जिल्हा होता. मात्र जे कोणी होते. त्यांनी भाजपची परिस्थिती जेमतेम ठेवण्याचा प्रयत्न केला.

त्यामध्ये वसंतराव औंढेकर, सुधाकरराव चिद्रवार, कृष्णा मोहरीर, विजय जोशी, डॉ. श्रीधर साने, शकुंतला परळीकर, शोभा तम्मेवार, शामसुंदर मुंडे, विलास चांदवडकर, अनिल मुदगलकर, मीना परतानी, भगवंत देसाई, पी.डी. पाटील, राजेश देशपांडे, दिलीप ठाकूर, दिनेश नरवाडकर, मोहन कुलकर्णी, संजय रिझवाणी, मनोज पिल्ले अशा अनेक भाजपच्या या निष्ठावंतांनी भाजप जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. पण यातील अनेकजण अडगळीला पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी भाजपकडून छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याची सुद्धा विचारपूस केली जायची व त्यांच्या सूचनेची दखल घेतल्या जायची. मात्र आजची परिस्थिती उलटी होऊन बसली आहे. ही सर्व जुनी मंडळी कोणत्या खाचखळग्यात आहेत. याची पुसटशीही जाणीव या सत्ताधार्‍यांना नसावी ही आश्‍चर्याची बाब म्हणावी लागेल.

Tags : Parbhani, BJP Expansion issue, Parbhani news