Sun, Sep 22, 2019 22:36होमपेज › Marathwada › नवरदेवाची नजर चुकवून नवरी प्रियकरासोबत पळाली

नवरदेवाची नजर चुकवून नवरी प्रियकरासोबत

Published On: May 25 2019 7:14PM | Last Updated: May 25 2019 7:15PM
हिंगोली : प्रतिनिधी

प्रेमासाठी काहीही करण्याची मानसिकता आजच्या प्रियकर व प्रियसीमध्ये रूजल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या प्रेम प्रकरणातून नववधुने चक्क आपल्या प्रियकरासोबत नवरदेवाची नजर चुकवून धूम ठोकल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास औंढा नागनाथ शहरातील बसस्थानक परिसरात घडली. 

औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या दर्शनासाठी नवीन लग्न झालेले जोडपे दररोज येतात. दररोज किमान १५ ते २० जोडपे नागनाथाचे दर्शन घेवून आपल्या सुखी संसाराची सुरूवात करतात. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास बाहेर गावाहून नवरदेव व नवरी दर्शनासाठी औंढा येथे आले होते. नागनाथाचे दर्शन घेतल्यानंतर बसस्थानकाशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये नवविवाहीत जोडप्याने चहा पाणी केले. जोडप्यासोबत नववधुचे वडीलही होते. आपल्या जावायाशी चर्चा सुरू असताना नववधुने नवरदेव व आपल्या वडीलाची नजर चुकवून हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या आपल्या प्रियकराच्या पल्सर या दुचाकीवर बसून हिंगोलीकडे धूम ठोकली. 

हा संपूर्ण प्रकार हॉटेलमध्ये बसलेल्या नवरदेवाने पाहिला आणि तो ओरडतच बाहेर आला. तर नववधुच्या प्रियकराने फिल्म स्टाइलने नववधू गाडीवर बसून पळविली. या घटनेची या परीसरात चांगलीच चर्चा झाली. नवरदेव व वधुचे वडील यांनी दोघांनाही आवाज देवून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी याकडे दुर्लक्ष करीत धूम ठोकली. दरम्यान याप्रकरणी औंढा पोलिसात कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.