Tue, Jul 16, 2019 14:12होमपेज › Marathwada › प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न; दोघे ताब्यात  

प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न; दोघे ताब्यात  

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMपूर्णा : प्रतिनिधी 

आग्रा येथून खरेदी करून परतणार्‍या एका प्रवाशाला अमृतसर-नांदेड रेल्वेमध्ये दोन चोरट्यांनी चुडावा रेल्वे स्थानकादरम्यान मारहाण करुन लूटमारीचा प्रयत्न केला, परंतु रेल्वेतील जागरूक प्रवाशी व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या दोघांना गजाआड करण्यात आले आहे.

रेल्वे पोलिसांच्या  माहितीनुसार, कंधार येथील विकासनगरातील रहिवासी सतीश अरविंद कांगणे व शंकर बनसोडे हे दोघे मित्र काही दिवसांपूर्वी आग्रा येथे खरेदीसाठी गेले होते. तेथे खरेदी करून ते दोघेही दि.16 मे रोजी आग्रयाहून नांदेडकडे येणार्‍या सचखंड एक्स्प्रेसने परत येत असताना  दि.17 मे रोजी चुडावा रेल्वे स्थानकाजवळ गाडी आली. यावेळी आरोपी साहेबराव मिलिंद सुपे व गौतम पौरे (रा. नांदेड) या दोघांनी कांगणे यांची बॅग उघडून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. पैसे हाती न लागल्याने मोबाइल हिसकावून घेत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान कांगणे यांनी गाडीची चैन ओढली. तेव्हा सुरक्षा बलाचे जवान चोपडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन चुडावा रेल्वे स्थानकात आणले. तसेच हिसकावलेला प्रवाशाचा मोबाइल हस्तगत केला. सतीश कांगणे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.