Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Marathwada › सुरेश धसांच्या रूपाने आष्टीला प्रथमच विधान परिषदेची उमेदवारी

सुरेश धसांच्या रूपाने आष्टीला प्रथमच विधान परिषदेची उमेदवारी

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 9:02PMपाटोदा : प्रतिनिधी

उस्मनाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप - शिवसेना व मित्रपक्षाचे उमेदवार म्हणून  माजी राज्यमंत्री सुरेश धस हे रिंगणात उतरले असून या निमित्ताने पाटोदा-आष्टी विधानसभा मतदारसंघातील नेत्याला पहिल्यांदाच विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी मिळाली आहे .

धस यांनी मागील वर्षी झालेल्या बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी अचानक राष्ट्रवादीची साथ सोडत आपल्या समर्थक सदस्यांचे पाठबळ भाजप च्या पाठीशी उभे केल्यामुळे जिल्हा परिषद ही भाजप च्या ताब्यात आली होती. त्यानंतर आत्तापर्यंत शह - काटशाहच्या राजकारणात धस यांच्या रखडलेल्या भाजप प्रवेशामुळे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. धस यांच्यासारख्या चाणाक्ष नेता हे राजकीय चक्रव्यूह कसा भेदणार याकडे राजकीय जाणकारांचेही लक्ष लागले होते मात्र त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी स्वतः पालकमंत्री पंकजा मुंडे या प्रयत्नशिल असल्याचे चित्र होते व त्यामुळेच सुरेश धस यांना या विधान परिषद निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळाली आहे. मात्र धस यांना आता विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असून, आष्टी मतदारसंघात यापूर्वी कोणालाही ती मिळालेली नव्हती.

पूर्वी ‘हाबाडा’ आता ‘धसका’ 

सुरेश धस यांची आत्तापर्यंतची राजकीय कारकीर्द पाहता त्यांना निवडणुकांमधील सर्व बेरीज-वजाबाकी व डाव - प्रतिडावांचा प्रचंड अनुभव आहे. या निवडणुकीत ते विजयी झाल्यास त्यांना तीन जिल्ह्यांच्या प्रतिनिधीत्वाची संधी मिळणार आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते हाबाडा फेम स्व. बाबूराव आडसकरांना ही संधी मिळाली होती, त्यानंतर आता सुरेश धसही हाबाड्याप्रमाणेच आपला खास ‘धसका’ या निवडणुकीत कसा दाखवतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असाही योगायोग 

सर्व नेत्यांमध्ये सुरेश धस यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांच्या रुपाने मतदारसंघाला प्रथमच मंत्रीपद मिळाले होते. आता त्यांच्याच रुपाने या मतदार संघातील नेत्याला प्रथमच विधान परिषद निवडणुकीची उमेदवारीही मिळाली आहे हा ही योगायोगच आहे.