Mon, Jul 22, 2019 13:29होमपेज › Marathwada › आष्टी नगरपंचायतचा कारभार महिलांच्या हाती

आष्टी नगरपंचायतचा कारभार महिलांच्या हाती

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 25 2018 9:39PMआष्टी : प्रतिनिधी

ओबीसी महिला आरक्षण आणि शुक्रवार रोजी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीने आष्टी नगरपंचायतचा कारभार आता संपूर्णपणे महिला वर्गाकडे आल्याने सर्व सूत्रे आता महिलांच्या हाती आहेत.आष्टी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर सर्वसाधारण जागेसाठी नगराध्यक्षपद राखीव होते एकहाती सत्ता मिळवलेल्या माजीमंत्री सुरेश धस यांच्या गटातून सुरुवातीच्या 15 महिन्यांच्या कालावधीत नवाब खान यांनी कारभार पाहिला. नंतरच्या 15 महिन्यात  रंगनाथ धोंडे नगराध्यक्षपदी विराजमान होते. मात्र अडीच वर्षांनंतर सुटलेल्या आरक्षणात हे पद ओबीसी महिलेसाठी रिक्त झाले. त्यामुळे आष्टी नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान संगीता विटकर यांना मिळाला.

शुक्रवार रोजी झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी पंखाबाई रेडेकर यांची वर्णी लागल्यानंतर या नगरपंचायतचा कारभार संपूर्णपणे महिलांच्या हातात गेल्याचे चित्र स्पष्ट झाले. या नगरपंचायतच्या मुख्याधिकारी म्हणून मंजूषा गुरमे, नगराध्यक्षा म्हणून संगीता विटकर, उपनगराध्यक्षा म्हणून पंखाबाई रेडेकर, पाणीपुरावठा सभापती म्हणून कल्पना धोंडे, महिला व बालकल्याण सभापती म्हणून वैशाली निकाळजे, स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून रुबीना शेख तर बांधकाम सभापती म्हणून सुजाता झरेकर यांच्याकडे पदभार आल्याने आता आष्टी नगरपंचायत संपूर्णपणे महिलांच्या हाती आली आहे. त्यामुळे आष्टीकरांच्या अपेक्षा किमान महिलांच्या हाती कारभार गेल्याने तरी पूर्ण होतील असे दिसून येते. अडीच वर्षांच्या काळात अनेक मुख्याधिकारी म्हणून आले आणि निघून गेले. त्यामुळे विकासाचा ढासळलेला आराखडा या नवनिर्वाचित रणरागिनी आपल्या कामाच्या माध्यमातून पूर्ण करतील असे इथल्या नागरिकांना वाटत आहे.

सुरेश धस यांचे सोशल इंजिनिअरिंग

नगरपंचायत स्थापनेनंतर नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण साठी आरक्षित असताना सुरुवातीच्या 15 महिन्यांच्या कालावधीत  नवाब खान या मुस्लिम कार्यकर्त्याला संधी दिली. नंतर रंगनाथ धोंडे हे माळी समाजाचे त्यांनीही नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. तर सद्यःस्थितीत संगीता विटकर या वडार समाजाच्या महिलेला सेवेची संधी दिली तर उपनगराध्यक्ष म्हणून पंखाबाई रेडेकर या मराठा समाजाच्या महिलेला संधी दिली. यातून धस यांनी नेहमीच सामाजिक सलोखा आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेत.