Fri, Mar 22, 2019 08:35होमपेज › Marathwada › आक्रोश मोर्चाने शहर  दणाणले

आक्रोश मोर्चाने शहर  दणाणले

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 29 2018 11:45PMबीड :  प्रतिनिधी

फुले, शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठेंच्या पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटनांची मालिका सुरू झाली आहे. राज्यासह देशभरात बौध्द, मुस्लिम, मातंग, चर्मकार समाजबांधवांवर अमानुष हल्ले, नग्न करून गावभर धिंड, सामूहिक बहिष्कार हे प्रकार वाढले आहेत. समाजामध्ये भयभीत वातावरण निर्माण करणारा भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, यांसह संविधानिक हक्कासाठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संभाजी भिडे यांना पाठीशी घालणार्‍यांना धडा शिकवू, असा इशारा यावेळी पप्पू कागदे यांनी दिला.

संविधानिक हक्क आणि अन्याय-अत्यचाराला वाचा फोडण्यासाठी रिपाइंकडून शुक्रवारी (दि.29)   बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील बौध्द, मुस्लिम, मातंग, चर्मकार समाज बांधवांसह बहुजन समाज हजारोंच्या संख्येने सामील झाला होता. यावेळी पप्पू कागदे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, की शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भीमा-कोरेगाव येथे शौर्य स्तंभावर गेलेल्या समाजबांधवांसह स्त्रिया व लहान मुलांवर दगडफेक करून दंगल घडवून आणण्यात आली. हे करणार्‍या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनसुध्दा  आजपर्यंत अटक करण्यात आली नाही. यावेळी  राजू जोगदंड, मिलिंद आव्हाड, मझर खान, धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, अशोक साळवे, किशोर कांडेकर, अविनाश जावळे, नरेंद्र जावळे, किसन तांगडे, दशरथ सोनवणे, दिपक कांबळे, महादेव उजगरे, अरुण भालेराव, अरुण निकाळजे, महेंद्र निकाळजे, लक्ष्मण सिरसाट, सचिन कागदे, रोहिदास बनसोडे, शिवाजी बामणे आदी उपस्थित होते. 

सरकारचे दुटप्पी धोरण असल्याचा आरोप

ज्यांनी  एल्गार परिषदेचे आयोजन केले होते, त्यांना देशद्रोह्यांप्रमाणे अटक केली जाते, परंतु भीमा कोरेगाव दंगलीचा सूत्रधार ज्याचे नाव एफआयआरमध्ये असतानाही, पुरावे नसल्याचे कारण पुढे करून संभाजी भिडेला अटक केली जात नाही. यावरून सरकारचे दुटप्पी धोरण दिसून येत आहे. आज आम्ही इतिहासातील सर्वांत वाईट दिवसांतून जात आहोत. एकीकडे अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करून दलितांवर खुलेआम अत्याचार करण्याचा जणू परवानाच दिला जात असल्याचेही पप्पू कागदे म्हणाले.

मोर्चेकर्‍यांनी केल्या या मागण्या

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कसलाच फेरबदल करण्यात येऊ नये, कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्याच्या विरोधात काढण्यात आलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, एल्गार परिषदेच्या आयोजकांवरील नक्षलवादी गुन्हे मागे घ्या, रमाई घरकूल योजनेसाठी ग्रामपंचायत ठरावी अट रद्द करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.