Wed, Apr 24, 2019 15:36होमपेज › Marathwada › हिंगोली जिल्ह्यात सतर्कतेच्या दृष्टीने शस्त्रबंदीचे आदेश लागू

हिंगोली जिल्ह्यात सतर्कतेच्या दृष्टीने शस्त्रबंदीचे आदेश लागू

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:42AMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्ह्यात शेतकर्‍यांची कर्जमाफी,  मालाला भाव,  वीज जोडणी, लोडशेडिंग अशा वेगवेगळ्या प्रश्‍नांमुळे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको असे विविध प्रश्‍न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याकरिता प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात दि. 9 मार्च ते 23 मार्चपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिकत जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणार्‍या कर्मचार्‍याव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणिक उपकरणे किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाहीत.

आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

हा आदेश पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकार्‍यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.