Tue, Apr 23, 2019 18:05होमपेज › Marathwada › पीकविम्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

उस्मानाबाद : ...तर पालकमंत्र्यांना घेराव घालणार!

Published On: Jul 21 2018 8:38PM | Last Updated: Jul 21 2018 8:37PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील पीकविम्याबाबत तोडगा काढण्यासाठी दिलेली आठ दिवसांची मुदत 22 तारखेला संपत आहे. या शिवाय सध्या ऑनलाईन पीकविमा भरतानाही सर्व्हर डाऊनमुळे अनेक अडचणी आहेत. त्यामुळे ऑफलाईन पीक विमा स्वीकारणे हाच पर्याय आहे. 24 तारखेपर्यंत  याबााबत निर्णय  झाला नाही तर, 25 तारखेला पालकमंत्री अर्जुन खोतकर यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला.राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, गेल्या आठवड्यात लोहारा आणि उस्मानाबाद तालुक्यातील पीक विम्याबाबत बैठक झाली. त्यात आठ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. ती मुदत संपत आली आहे. याबाबत जबाबदारी म्हणून पालकमंत्री खोतकर यांनी याचा फॉलोअप घ्यावा व शेतकर्‍यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्‍कम लवकर पडावी यादृष्टीने प्रयत्न करावेत.

त्यासाठी आम्ही 24 तारखेपर्यंतची मुदत त्यांना देत आहोत. या शिवाय सध्या ऑनलाईन पीकविमा भरताना शेतकरी अडचणीत आला आहे. सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील केवळ 84 हजार शेतकर्‍यांनाच पीक विमा भरता आला आहे. अजून 2 लाख 95 हजार फॉर्म प्रतिक्षेत आहेत. दोन दिवसांत सर्व्हर डाऊनची समस्या सुटली नाही तर ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारावेत अन्यथा 25 तारखेला पालकमंत्र्यांना घेराओ घातला जाईल, असा इशारा आ. पाटील यांनी दिला.

कसे होईल मेडीकल कॉलेज?

आ. पाटील म्हणाले, की मार्च महिन्यात ना. गिरीश महाजन यांनी उस्मानाबादेत मेडिकल कॉलेज करण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर अर्थसंकल्पी अधीवेशन झाले. त्यात या कॉलेजसाठी रुपयाचीही तरतूद नाही. पुरवणी मागण्यांतही नाही. आता त्यांनी कॉलेजी घोषणा केली आहे. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात तरतूदच नसल्याने कॉलेज कसे होईल, असा प्रतिप्रश्‍न आ. पाटील यांनी पत्रकारांना केला. याचे उत्तर सरकारनेही देण्याची त्यांनी मागणी केली.