Mon, May 20, 2019 10:21होमपेज › Marathwada › मोगर्‍याचा सुगंध महागला

मोगर्‍याचा सुगंध महागला

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:57AMअंबाजोगाई  : रवी मठपती 

तापमानात प्रचंड झालेल्या वाढीचा परिणाम फुलं बाजारावर झाला आहे. पाण्याची कमतरता व उन्हाच्या तीव्र झळा यांमुळे बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. फुलांच्या किमतीमध्ये दीड ते दुप्पटीने वाढ झाल्याने लग्नसराईच्या दिवसात ग्राहकांना फटका बसत आहे. मागणी असलेल्या निशिगंधा, जर्बेरा, झेंडू, मोगरा, गुलाब, गलांडा इत्यादी  फुलांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने फूल बाजार तेजीत आहे.

मार्च अखेरीस विहिरी व बोअरचे पाणी प्रचंड प्रमाणात कमी होते विहिरीला खर्डा लागते. त्यामुळे फुलशेतीला वेळेवर पाणी देता येत नाही फुलझाडेही नाजूक असल्याने त्यांना सतत पाण्याची गरज असते पाणीच नसल्याने फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. उत्पन्न कमी झाल्याने बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक घटली आहे. अंबाजोगाई तालुक्यात फुलशेती नसल्यातच जमा आहे. अंबाजोगाई येथे नांदेड येथून फुले मागवली जातात. शहरामध्ये 50 च्या आसपास फुलविक्रेते व्यवसाय करतात. फुलांचे दर गगनाला मिळाल्याने फुल खरेदीसाठी फूल विक्रेत्यांना मोठी गुंतवणूक करावी लागत आहे. त्याचप्रमाणे फुले नाजूक असल्याने साठवणूक करणे अवघड आहे. एरवी 60 ते 100 रुपये प्रतिकिलो मिळणारे निशिगंधा फुलं सध्या बाजारात तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. वर्षातून केवळ एप्रिल महिन्यात सुगंध दरवळणारा म्हणून ओळखला जाणारा मोगरा साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. 

एक गजरा पंधरा ते वीस रुपयाला विकला जात आहे, तसेच जरबेरा 20 ते 30 वरून 100 ते 110 गड्डी विकली जात आहे. जरबेराचे 1 फूल दहा रुपयांत विक्री होत आहे झेंडूची फुले बाजारात सध्या उपलब्ध नसल्याचे दिसत आहे एक रुपयास मिळणारे गुलाब पुष्प पाच रुपयास मिळत आहे. 20 ते 30 रुपये किमतीवरून 60 रुपयांपर्यंत गलांडा फुले विकली जात आहेत त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ दहा रुपयांत तर बुके 40 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अशी माहिती मंडी बाजारातील फुलविक्रेते पिंटू महादेव यशवंते यांनी सांगितले