Thu, May 23, 2019 04:52



होमपेज › Marathwada › बाराखांबी उत्खननात आढळल्या पुरातन मूर्ती

बाराखांबी उत्खननात आढळल्या पुरातन मूर्ती

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AM



अंबाजोगाई : प्रतिनिधी 

येथील बाराखांबी (सकलेश्वर मंदिर) परिसरात उत्खननात शेकडो कोरीव दगडी मूर्ती आढळल्या. अकराव्या शतकात उभारलेले हे दगडी मंदिर आजही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. परिसरात उत्खननात दगडी महादेवाची पिंड, घोडेस्वार व पादुका आढळून आल्याची माहिती पुरातत्व खात्याच्या तंत्र सहाय्यक निलिमा मार्कंडे व समन्वयक डॉ. कामाजी डक यांनी दिली.

शहराच्या उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर अकराव्या शतकात उभारलेले सकलेश्वर मंदिर आहे. ते मोडकळीस आले आहे. याच परिसरात जमिनीत गाडलेल्या अनेक कोरीव दगडी मूर्ती आढळल्या. याची दखल शासनाच्या पुरातत्व खात्याने घेतली. संशोधक मयूरेश खडके व त्यांच्या सहकार्‍यांना यांनी परिसराची पाहणी केली होती.

परिसरात सकलेश्वर मंदिराजवळ (बाराखांबी) आणखी दोन मंदिराचा पाया आढळला. मंदिरासमोर नदी किंवा तलाव होता. त्यामुळे दगडी पायर्‍या या ठिकाणी आढळतात. सध्या पुरातत्व खात्याचे दोन अधिकारी व सहा मजूर या ठिकाणी उत्खननाचे काम करीत आहेत. आजपर्यंत शंभरपेक्षा जास्त दगडी मूर्ती सापडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.