Mon, Jun 17, 2019 02:21होमपेज › Marathwada › पाणवठ्यांच्या शोधात प्राण्यांची भटकंती

पाणवठ्यांच्या शोधात प्राण्यांची भटकंती

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 11:29PMपरभणी : प्रतिनिधी

उन्हाचा पारा वाढल्याने जिव्हाची लाही...लाही होत आहे. क्षणभर विश्रांती अन् थंडगार पाणी मिळवण्यासाठी धडपडणारे प्रवासी, डोक्यावर टोपी अन् तोंडाला रुमाल बांधून उन्हापासून संरक्षण करण्यात येत आहे, परंतु ऊन-वारा-पावसाची भीती न बाळगता वास्तव्य करत असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील प्राणी मात्र तहान भागविण्यासाठी पाण्याच्या शोधात भटंकती करीत आहेत. 

वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेले असल्याने असणारे जलस्रोतही कोरडे पडले आहेत. विद्यापीठात असलेले सिंचन क्षेत्रही कमी प्रमाणात असल्याने त्या ठिकाणीही पाणी साचत नसल्याने प्राण्यांना पाणी मिळत नाही. विद्यापीठाच्या क्षेत्रात जलस्रोतांची संख्या कमी आहे. 

यामुळे या परिसरात असलेले हरीण, ससे व  इतर वन्य प्राण्यांना पाणीच राहिले नाही. यामुळे हरिणाचे कळप विद्यापीठ परिसरातून पाणी असलेल्या क्षेत्रात जाऊन दिवसभर भटकंती करून चारा-पाणी मिळवित आहेत.  

विद्यापीठाव्यतिरिक्‍त भटकंती करत असलेला हरिणांचा कळप पाहून शिकारी जाळे टाकण्याची शक्यता आहे.  निर्मनुष्य ठिकाणी वास्तव्य करणारे हरीण  अलीकडील काळात पाण्यासाठी लोकवस्ती व शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांच्या सहवासातही येऊ लागले आहेत, परंतु पाणीटंचाईची तीव्रता सगळीकडे असल्यामुळे हरिणासाठी  पाण्याची व्यवस्था कोण करणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

विद्यापीठातील परिसराची एक वेगळी ओळख म्हणून हरणाचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. लहान मोठ्या वयातील हरणांबरोबरच इतर वन्यप्राणीदेखील विद्यापीठात अधिवास करीत असतात. मात्र उन्हाच्या कडाक्याने पानझड झालेल्या वृक्षांखाली सावलीच नसल्याने प्राण्याच्या विश्रांतीचा आश्रयही आता नष्ट झाला आहे.  

यामुळे परिसरातील वन्यजीव गोदावरी नदी व कॅनॉल परिक्षेत्रातील सिंचित भूभागाकडे जात असून त्याठिकाणी देखील ते राहणे कठीण बनले आहे. त्यामुळे वन विभागानेे याकडे वेळीच लक्ष देऊन विद्यापीठातील वन्यजीव संवर्धित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी जलस्रोत त्वरित निर्माण करावेत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त करण्यात येत आहेत.  यासाठी स्वंयसेवी संस्था व वन्यजीव प्रेमींनी एकत्रीत येऊन उन्हाळ्यात वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

Tags : Animal wanderings in search of watersports