Wed, Jul 17, 2019 18:00होमपेज › Marathwada › आंदोलनांनी गाजला परभणीकरांचा सोमवार

आंदोलनांनी गाजला परभणीकरांचा सोमवार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे धरणे

परभणी: प्रतिनिधी

अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी 2 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघातर्फे कर्मचार्‍यांनी बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे. 

छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या मैदानात कर्मचार्‍यांनी ठिय्या मांडून सरकारला जागे करण्यासाठी आपले विचार मांडून अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली. शासन स्तरावर कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सेवासमाप्‍ती लाभ मिळण्या संदर्भात 20 एप्रिल 2014 च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पातील सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सेवासमाप्‍तीनंतरचा एक रकमी लाभ मिळवून देण्यात यावा. मयत झालेल्या अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या वारसास विमा मिळवून द्यावा. एल. आय. सी. कार्यालय पुणेकडे सादर केलेल्या प्रस्तावाची यादी जाहीर करण्यात यावी, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आधारलिंक झालेले असताना काही प्रकल्पाने जाणूनबुजून पी. एफ. एम. द्वारे दुसर्‍या बँकेत मानधन जमा करून अंगणवाडी कर्मचार्‍यांची हेळसांड केली, अशा कर्मचार्‍यांची चौकशी करावी. ओळखपत्राच्या नावाखाली कर्मचार्‍यांकडून 50 रुपये वसुली बंद करावी. सेविका व मदतनिसांना फरकासहित वाढीव मानधन तत्काळ देण्यात यावे.  सेवा समाप्‍तीचा लाभ देण्यात यावा, आदी विविध मागण्या आंदोलकांनी जिल्हधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात मांडल्या आहेत. 

मूकबधिर एकता असोसिएशन

परभणी : प्रतिनिधी

जिल्हा युवक मुकबधीर एकता असोसिएशनतर्फे 2 एप्रिलपासून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी मागण्या मांडल्या आहेत. 

शासकीय जिल्हा रुग्णालय जिल्हा नियोजन समितीमार्फत बेरा टेस्ट यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. महानगर पालिका व नगर परिषद यांच्या उत्पन्‍नाच्या 3 टक्के निधी दिव्यांगांच्या योजनांवर खर्च करून दिव्यांगांना लाभ मिळवून द्यावा. अपंगांना पेन्शन योजना मिळवून द्यावी. महानगर पालिकेच्या 2013 च्या सर्वसाधारण सभेत परभणी जिल्हा मूकबधिर एकता असोसिएशनसाठी मान्य केलेली रिक्‍त जागा शासनाकडून हस्तांतरित करावी व गरजू लाभार्थीला त्या कामावर ठेवण्यात यावे. महानगर पालिकेच्या हद्दीतील जागेवर विनाअट अपंगांना घरकूल उपलब्ध करून द्यावे. अपंगांना त्यांना त्यांचे स्वतःचे रेशनकार्ड बीपीएल देण्यात यावे. उत्पन्‍नाचा दाखला 21 हजारांच्या आतीलच असावा, ही अट रद्द करावी. संजय गांधी निराधार योजनेेचे अनुदान लवकर मंजूर करावे आदी विविध मागण्या  निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.  निवेदनावर मंगलप्रसाद बंग, सय्यद नवाब जामकर, रणजित सावळे, सय्यद इम्रान, सुदाम वैद्य, शब्बीर पिंजारी, शेख नूर परवीन आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

गटसचिव कर्मचारी संघटना आंदोलन

परभणी : प्रतिनिधी

विविध सेवा सहकारी संस्थांमध्ये काम करणार्‍या गटसचिवांचे गेल्या 10 ते 12 महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. बँक कायद्याच्या तरतुदीप्रमाणे गटसचिवांच्या वेतनासाठी निधी न दिल्यास सहकारी विभागाने जी कार्यवाही करायला पाहिजे ती केली नाही. यामुळे संघटनेतर्फे 2 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत  धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. 

ऑगस्ट 2014 ते जानेवारी 2015 ते मार्च 2018 पर्यंतचे वेतन तत्काळ देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या  कर्जमाफीतून गटचिवांच्या वेतनासाठी 2 टक्के वर्गणीप्रमाणे निधी देण्यात यावा. संस्था सक्षमीकरण 1 टक्के निधी गटसचिवांच्या थकीत वेतनासाठी वापरण्यात यावा. 6 डिसेंबरच्या निर्देशांची अंमलबजावणी करून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गटसचिवांच्या वेतनासाठी सव्वापट वर्गणी त्वरित देण्यात यावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांनी केल्या आहेत.  या आंदोलनात एकनाथ जाधव, बाबुराव भवर, अशोक सातपुते, भुजंगराव मगर, अशोक चव्हाण, शिवाजी सापनर, दिनकर दौंड, सुधाकर जाधव, महेश अडकिणे, संतोष पतंगे, नंदकुमार शिंदे, सुनील सोनटक्के, कालिदास कदम, भगवान गव्हाणे, संजय व्यवहारे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत.


  •