होमपेज › Marathwada › अंगणवाडीतून होणार आधार नोंदणी 

अंगणवाडीतून होणार आधार नोंदणी 

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 12:44AMअंबजोगाई  : प्रतिनिधी 

तालुक्यातील अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या अठरा हजार बालकांना आधार कार्ड दिले जाणार आहे. जुलै महिन्यापासून आधार कार्डासाठीची  माहिती संकलन सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे तालुक्यातील सतरा  हजार नऊशे बालकांची आधार नोंदणी होणार असून पालकांची धावपळ बंद होणार आहे. आधार नोंदणीची धुरा आता खासगी एजन्सी ऐवजी अंगणवाडी पर्यवेक्षिकांवर सोपविण्यात आली आहे. 

कुठल्याही शासकीय व अशासकीय कामकाजासाठी आधार कार्ड अत्यावश्यक दस्तावेज मानले जात आहे. खासगी क्षेत्रातही आधार वरून ओळख पटवण्यासाठी उपयोगी ठरत आहे. शाळा, महाविद्यालयीन प्रवेशासाठीही आधार गरजेचे आहे.आधार कार्ड काढण्यासाठी आधार केंद्रावर गर्दी होताना नेहमीच पाहायला मिळते. शाळकरी विशेषतः प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी रांगेत उभे राहणे मुश्किल व जिकिरीचे ठरत असल्याने शासनाने आता अंगणवाडीतच आधारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे पालकांची होणारी धावपळ थांबणार आहे.

अंबजोगाई तालुक्यातील 251 अंगणवाडीतील 17 हजार 900  बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीतच होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून सध्या  तहसील कार्यालय, महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार आदी ठिकाणी आधार कार्ड नोंदणीसाठी, नाव, पत्ता दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येते. शासनाने आधारकार्ड बंधनकारक केल्याने  तरुण, वयस्क यांना आधार केंद्रावर तासन्तास थांबणे कदाचित शक्य आहे, परंतु  लहान बालकांना ते शक्य होत नाही. त्यामुळे बालकांचे आधारकार्ड काढणे कठीण झालेले दिसून येते. आधारकार्ड काढून मिळावे यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये यंत्रणेमार्फत कॅम्पही घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात बालकांची आधार नोंदणी मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. सर्व ठिकाणी हा प्रयोग राबविला जात आहे. 

टॅबच्या माध्यमातून नोंदणी

अंबजोगाई तालुक्यातील दहा अंगणवाडी केंद्राच्या पर्यवेक्षिकांना शासनाकडून दहा टॅब देण्यात आले आहेत. शून्य ते सहा या वयोगटांतील बालकांची आधार नोंदणीची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिकावर सोपविण्यात आली आहे. टॅबच्या माध्यमातून ही नोंदणी होत आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका आधारची नोंदणी करून संपूर्ण माहिती संबंधित विभागाच्या साईटवर अपडेट केली जाते. त्यानंतर पालकांच्या पत्त्यावर आधारकार्ड पाठविले जाणार असल्याचे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी सांगितले.

एजन्सीमार्फ त नोंदणीचे काम धिम्यागतीने 

आधार नोंदणीचे काम अत्यंत धिम्या गतीने होत होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीचे काम पेंडिंग राहिले होते. आता शासनाने आधार नोंदणीचे काम अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे दिले आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. बर्दापूर, भावठाणा, घाटनांदूर, उजनी, धानोरा, सायगाव, येल्डा, आपेगाव पट्टीवडगाव आदी केंद्रांमध्ये आधार नोंदणीचे काम सुरू  राहणार असल्याचेही नागरगोजे म्हणाले.