परळी : रवींद्र जोशी
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथगड या स्मृतीस्थळाच्या परिसरात गेल्या वर्षी लागवड करण्यात आलेल्या सुमारे 400 केशर आम्रवृक्षांचे संगोपन अतिशय भावनिकतेने केले जात आहे. लोकनेत्याप्रमाणे ही झाडे आपली सावली बनतील तसेच नेहमी गोड आणि रसाळ फळे देतील या भावनेतून ही ‘आमराई’ गोपीनाथ गड परिसरात बहरत आहे.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गोपीनाथ गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आम्रवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. पंकजा मुंडे यांच्या शुभ हस्ते आम्रवृक्षाची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर एकाचवेळी सुमारे चारशे आम्रवृक्षांची सर्व लोकप्रतिनिधी, मान्यवर व गावोगावच्या नागरिकांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आलेली होती. एक वर्षापूर्वी लागवड करण्यात आलेली ही आमराई आता बहरात येत आहे. पुढच्या वर्षी निश्चितच या आमराईतील गोड व रसाळ आंबे उपलब्ध होणार आहेत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात गोपीनाथ गड हे समाधीस्थान विकसित करण्यात आले आहे. जवळपास सोळा एक्करच्या परिसरात ऊर्जा, आशा आणि प्रेरणा देणारा हा गड उभा आहे. हा परिसर सुशोभित करताना परिसरात शोभेची झाडे वाढवतानांच सर्वोपयोगी अशा आंब्याच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी या परिसरात जवळपास साडेचार एक्कर क्षेत्रात जवळपास 400 झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. ही आमराई आता बहरात येत आहे. पुढच्या वर्षी निश्चितच या आमराईतील गोड व रसाळ आंबे उपलब्ध होणार आहेत.