Sat, Jul 20, 2019 15:42होमपेज › Marathwada › पैशांअभावी मार्ग खुंटले

पैशांअभावी मार्ग खुंटले

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 11:22PMअंबाजोगाई : प्रतिनिधी

अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागात सोमवारी (21 मे) सकाळी 9 च्या सुमारास पट्टीवडगाव येथील महिलेने मत्स्यबाळाला जन्म दिला. या बाळाला वैद्यकीय परिभाषेत सिरोनोमेलिया (मत्स्यपरी) असे म्हणतात. सदरील बाळाला अवघे 15 मिनिटांचेच आयुष्य मिळाले. आर्थिक विवंचना व सासर्‍याच्या मृत्युमुळे या महिलेला सोनोग्राफी करता आली नाही अशी माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाचे हे अपयश मानले जात आहे.

महिला ऊसतोड मजूर आहे. या महिलेची पहिली मुलगी आजाराने मृत्यू पावली. दुसरी मुलगी दोन वर्षांची आहे. हा तिसरा गर्भ राहिला होता. पती मजुरी करतो. तपासणीसाठी पैसे नसल्याने महिलेने गरोदर राहिल्यानंतर घरी सांगितलेच नाही. सहा महिन्यानंतर महिलेच्या पोटात जास्त दुखू लागले म्हणून पट्टीवडगाव उपकेंद्रात तिला घरच्यांनी दाखवले. त्यानंतर सोनोग्राफीसाठी तिला उजणी उपकेंद्राकडे पाठवण्यात आले. त्या ठिकाणी खासगी सोनोग्राफी डॉक्टर उपकेंद्रात येऊन सोनोग्राफ ी करतो. त्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. पंतप्रधान मातृत्व योजनेअंतर्गत खासगी डॉक्टरांना पैसे मिळतात. ही महिला उजणीला गेली, मात्र सोनोग्राफी करणारा आलाच नसल्याने तिला परत यावे लागले. गावाकडे आल्यानंतर अचानक सासरे वारले. या दुःखासमोर आपली अडचण कुठे मांडावी हा विचार महिलेने केला. त्यातून सोनोग्राफीचे महिना दीड महिना लांबणीवर पडले.

ही बाब महिलेच्या आई वडिलांना समजल्यानंतर त्यांनी मुलीची खासगी ठिकाणी सोनोग्राफी केली. त्यात बाळाचे व्यंग लक्षात आले, मात्र उशीर झाल्याने गर्भपात करता येणे शक्य नसल्याने प्रसूतीची वाट पहा असा सल्ला डॉक्टरांनी दिला. महिलेला प्रसूतीसाठी अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळ जन्माला आले परंतू त्याला पंधरा मिनिटाचे आयुष्य मिळाले. या घटनेमुळे बाळाला जन्म देणारी माता सध्या मानसिकरित्या खचून गेली आहे. या घटनेच्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर आरोगय विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग खडबडून जागा झाला आहे. आपल्या पातळीवर कुठे चुका झाल्या नाहीत ना याचीही अधिकार्‍यांनी खातरजमा केली. आमच्या पातळीवर वैद्यकीय सल्ला वेळोवेळी दिला, मात्र महिलेने वैद्यकीय तपासणी करून घ्यावयास पाहिजे ती न केल्याचा निष्कर्ष त्यातून काढण्यात आला.