Tue, Jun 25, 2019 13:08होमपेज › Marathwada › अंबाजोगाईकरांना प्रेशर हॉर्नचा त्रास 

अंबाजोगाईकरांना प्रेशर हॉर्नचा त्रास 

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 11:09PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

अंबाजोगाई शहरातील मंडी बाजारमध्ये सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी व वाहनांच्या कर्णकर्कश असलेल्या प्रेशर हॉर्नच्या आवाजामुळे अनेक व्यापार्‍यांना व दुकानात काम करणार्‍या नोकरांना बहिरेपणा व हृदयाचे ठोके वाढत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बाजारपेठेत नियुक्‍त करण्यात आलेले वाहतूक पोलिस कुचकामी ठरत असल्याने वाहनधारकांना धाक राहिला नसल्याने विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार म्हणजे महत्त्वाची व मोठी बाजारपेठ. आवश्यक असलेल्या सर्व वस्तू मंडी बाजारात मिळतात. नागरिकांची या ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नेहमीच वर्दळ असते. ग्रामदैवत असलेल्या योगेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त दूर दूरुन येतात. मंडी बाजारात असलेली वर्दळ व दुकांनाची संख्या पाहता एकमेव असलेला रस्ता अत्यंत लहान होत आहे. अरुंद रस्त्यामुळे व्यापारी आधीच परेशान आहेत. त्यातच काही टवाळखोरांकडून महिला, मुली व वृद्धांना त्रास होईल या उद्देशाने अतिउच्च दाबाचे हॉर्न वाजवितात. त्यामुळे सर्व समान्यांसह व्यापायांनाही याचा त्रास होत आहे.  

अंबाजोगाई शांत शहर म्हणून  सर्वपरिचित आहे. पुण्यानंतर अंबाजोगाई शहरास शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाते. त्यामुळे विद्यार्थी संख्या हजोरोंच्या घरात आहे.  दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. मंडी बाजारात सतत वाहनांची कोंडी होते. वाहने रस्त्यावरच आडवी तिडवी उभी केलेली असतात.दुकानासमोर रस्त्यावर व्यापारी आपले बरेच साहित्य विक्रीसाठी ठेवतात. दुकानाच्या पाट्या, हातगाडे, वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. बहुतांश व्यापार्‍यांनी पार्किंग ठेवलेली नाही. शहरातील प्रशांत नगर, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागांत अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. या कोंडीत सापडलेल्या नागरिकांना मोठ मोठ्या आवाजाच्या हॉर्नचा त्रास सहन करावा लागत आहे. काही टवाळखोर मंडळी रस्ता मोकळा असला तरी कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. प्रेशर हॉर्नचा वयोवृद्धांना त्रास होत आहे.

साधारणतः 90 डेसीबलपर्यंतचा आवाज मानव सहन करू शकतो. कायद्यान्वये  65 डेसीबलपर्यंतचे हॉर्न वाहनाला बसविणे आवश्यक आहे, मात्र शहरात अतिउच्च दाबाच्या हॉर्नची चलती असल्याचे रोडवर ऐकावयास मिळत आहे. परिणामी व्यापार्‍यांना हृदय विकार व बहिरेपणा सारख्या आजारास  बळी पडावे लागते आहे. गंमत म्हणजे ग्राहक काय मागतो आहे? हे कर्णकर्कश आवाजामुळे किमान तीन वेळा पुन्हा विचारावे लागते. त्यामुळे व्यापारी व ग्राहक यांच्यात अनेकदा गैरसमज होऊन वाद उद्भवत असल्याचे शहरातील व्यापारी विनोद मुथा, आनंद बडेरा,यश बडेरा, अशोक झरकर, भूषण मुथा यांनी सांगितले.  ही समस्या दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. त्यामुळे कारवाई नियमितपणे केले तर त्याचा परिणाम दिसून येईल असे व्यापारी सांगत आहेत.