Thu, Apr 25, 2019 15:44होमपेज › Marathwada › कांगणेवाडीजवळ अपघातात दोन सख्ख्या बहिणी ठार

कांगणेवाडीजवळ अपघातात दोन सख्ख्या बहिणी ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अंबाजोगाई :  प्रतिनिधी 

भरधाव वेगातील कंटेनरवाहक ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी तीन वाजण्याच्या  सुमारास परळी तालुक्यातील कांगणेवाडी जवळ झाला.

परळी तालुक्यातील जोडवाडी येथील शिक्षक त्रिंबक दराडे हे त्यांची पत्नी विमल (वय ४५) आणि मेहुणी संगीता हनुमंत कांगणे (वय ४०, रा. कांगणेवाडी) यांना घेऊन मोटारसायकलवरून कांगणेवाडीकडे येत होते. कांगणेवाडी पाटीजवळ आले असता भरधाव वेगातील कंटेनरवाहक ट्रकने (एमएच ४४ - ९५५३) त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात ट्रकखाली आल्याने विमल दराडे आणि संगीता कांगणे या दोन सख्ख्या भगिनींचा जागेवरच मृत्यू झाला तर त्रिंबक दराडे हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक जागेवर सोडून पळ काढला. घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही भगिनींचे शवविच्छेदन करण्यात आले.

महामार्गाच्या कामाच्या संथगतीमुळे वारंवार अपघात 

अहमदपूर ते नगर या महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. परंतु, अत्यंत संथगतीने काम सुरु असल्याने वाहनधारकांना अरुंद रस्त्यावरून कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे या रोडवर वारंवार अपघात होत असून, अनेकांना नाहक जीव गमवावा लागत असल्याची तक्रार या भागातील संतप्त ग्रामस्थ करू लागले आहेत.