होमपेज › Marathwada › अंबाजोगाईत साथरोगाचे रुग्ण वाढले 

अंबाजोगाईत साथरोगाचे रुग्ण वाढले 

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 12:50AMअंबाजोगाई : प्रतिनिधी

शहरात सर्वत्र नाल्या तुंबल्यामुळे घाणीचे साम्राज्य परसल्याने साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरात वाढत्या दुर्गंधीमुळे नागरिक कमालीचे हतबल झाले होते. या बाबत दैनिक पुढारीमध्ये वृत प्रसिद्ध करताच पालिकेचे प्रशासन खडबडून जागे होत स्वच्छतेची मोहीम राबवणे सुरू केले आहे. यात फॉग मशीनद्वारे धूर फवारणी व नाल्याची सफाईची मोहीम हाती घेतली आहे. साथीचे आजार पसरण्याआधीच पालिकेने उपाययोजना केली असती तर पालिकेला ही नामुष्कीची वेळ आज आली नसती. 

अंबाजोगाई शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्यापूर्वीच शहरातील मोठे नाले व नाल्या सफाईचे काम पालिकेने करणे गरजेचे होते, परंतु कंत्राटदार व प्रशासन या दोघांनीही या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले होते. शहरातील विविध भागात नाल्या तुंबल्यामुळे साथीच्या आजारात वाढ झाली. यामुळे स्वाराती रुग्णालयासह खासगी रुग्णालयात साथीच्या आजाराने त्रस्त झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले याची पालिकेने दखल न घेतल्याबाबतचे वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रकाशित केले होते. 

या वृत्ताची दखल घेऊन पालिका प्रशासन खडबडून जागे होत पूर्वी 70 मजुरांवर होणारे स्वच्छतेचे काम  वाढल्यामुळे मजुरांची संख्या सव्वाशे पर्यंत करून शहरातील 1 ते 14 वॉर्ड स्वच्छतेसाठी प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. मोठ्या नाल्यासह छोट्या नाल्या, साथीचे आजार बळावल्यानंतर पालिकेने आता सफाईचे काम हाती घेतले आहे. 

सध्या नगर पालिकेकडे 6 फॉग मशीन असल्यातरी त्यातील चार मशीनद्वारे धूर फवारणीचे काम शहरात सुरू आहे. चार हातपंपाने कीटक नाशक फवारणीचे काम हाती घेतले आहे.  मोरेवाडी ग्रामपंचायतकडे असलेली एक फॉग मशीन  पालिकेने धूर फवारणीसाठी तात्पुरत्या स्वरूपात आणली आहे. अशा एकूण पाच मशीनद्वारे धूर फवारणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे.