होमपेज › Marathwada › खर्रा ‘पन्नी’चा सर्रास वापर

खर्रा ‘पन्नी’चा सर्रास वापर

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 29 2018 11:50PMहिंगोली : प्रतिनिधी

राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी आणली असली, तरी हिंगोली शहरात प्लास्टिक वापरणार्‍यांची संख्या कमी झालेली नाही. थातूरमातूर कारवाई केली असली तरी खर्रा शौकिनांना मात्र प्लास्टिकच्या पन्नीतच आजही खर्रा उपलब्ध होत आहे. या पन्नीवर पालिकेच्या पथकाने एकही कारवाई केल्याची नोंद अद्यापही झालेली नाही. प्लास्टिकवर बंदी असतांना खर्रा घोटणे सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र आहे. 

हिंगोली शहरात सुपारी, तंबाखू व चुनामिश्रित खर्रा खाणार्‍यांची संख्या मोठी आहे. ओला व कोरडा खर्रा मोठ्या प्रमाणात विकल्या जातो. खर्रा प्लास्टिकच्या पन्नीत घोटून ग्राहकांना दिला जातो. 
गुटखा बंदी असली तरी खर्रा बंदी मात्र झाल्याचे दिसून येत नाही. अनेकदा पोलिसांकडून गुटखा जप्‍त केला जातो, परंतु खर्रा विक्री करणार्‍या पानटपरीधारकांना अभय देण्याचा प्रकार कायम सुरू आहे. त्यातच मागील आठवड्यात राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या निर्णयाचा फटका खर्रा विक्रेत्यांना बसेल असा अंदाज होता, परंतु प्लास्टिक बंदीनंतरही खर्राची विक्री जोमात सुरू आहे. यासाठी प्लास्टिकची पन्नी वापरली जात आहे. शहरातील 70 ते 80 पानटपरीधारकांकडून अजूनही खर्रासाठी पन्नीचा वापर केला जात असल्याने प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे खर्रा विक्रीचे प्रमाण मोठे असल्याने खर्रा हातावर घोटण्याऐवजी बाजारात टपरीचालकांनी चार ते पाच हजार रुपये खर्चून इलेक्ट्रॉनिक्स मशीन विकत घेतल्या आहेत. या मशीनमधून खर्रा घोटळा जात आहे. त्यानंतर प्लास्टिकच्या पन्नीमध्ये गुंडाळून तो ग्राहकांना दिला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. 

एकीकडे गुटखा बंदीचा गाजावाजा करण्यात आला असला तरी, गुटखा बंदीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. त्यातच प्लास्टिक बंदी करून राज्य शासनाने दोन पाऊले पुढे टाकली असली तरी खर्रा शौकिनांना अजूनही प्लास्टिक पन्नीमध्ये तो उपलब्ध होत असल्याने प्लास्टिक पन्नी वापराविरोधात कारवाईची गरज निर्माण झाली आहे. 

युवा पिढी गुटखा व खर्राच्या व्यसनाधिनतेमुळे धोक्यात आल्याचे चित्र असताना अद्यापही प्रशासनाकडून खर्रात वापरल्या जात असलेल्या पन्नीबाबत कारवाईचे धोरण अवलंबिले नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.