Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Marathwada › कृषी सोलार वाहिनी निविदेत परभणीला वगळले

कृषी सोलार वाहिनी निविदेत परभणीला वगळले

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMपरभणी : प्रतिनिधी

कृषी उत्पादन घेत असताना अखंड वीजपुरवठा सुरू राहावा हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित करण्याचे निश्‍चित केले. यात परभणी जिल्ह्यातील सहा ठिकाणांचा समावेश असून त्याकरिता 3 कोटींचा निधी प्रस्तावित झाला होता, पण 27 एप्रिल रोजी काढलेल्या निविदेत 20 जिल्ह्यातील 218 तालुक्यांच्या समावेशात परभणीचा कुठेही उल्‍लेख केला नसल्याची बाब उघड झाली आहे. 

राज्यातील ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी वाहिनी विलगीकरण झाले आहे. अशा ठिकाणच्या कृषी वाहिनी सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची मोठी बचत होऊ शकते. या बचत झालेल्या विजेचा वापर इतर उत्पादनक्षम कामांसाठी होऊ शकतो. परिणामी महावितरणचा विजेच्या खरेदीवर होणारा खर्च कमी होईल व पारंपरिक विजेची बचत होईल या बाबींचा शेतकर्‍यांना माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यातून ही योजना सुरू करण्याचे निश्‍चित केले. या योजनेत परभणी जिल्ह्यातील सहा ठिकाणे निवडली होती, पण ही योजना महाराष्ट्र वीज वितरण कंपनी (एम.एस.इ.डी.सी.एल.) मार्फत राज्यातील 20 जिल्ह्यातील 218 तालुक्यांत राबवली जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यातील 33/11 केव्ही उपकेंद्राजवळ 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प निर्माण करून त्याद्वारे तयार होणार्‍या सौर ऊर्जेचा वापर त्याच परिसरातील कृषी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना अखंड विजेचा पुरवठा केला जाईल असे स्वरूप होते. निविदा क्रं.एम.एस.इ.डी.सी.एल/पी.पी/एन.सी.ई/2018/1000 मेगावॅट सौर/टी04 दि.27 एप्रिल रोजी काढली. यात परभणी, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत येणारा तब्बल 40 टक्के भाग योजनेपासून वंचित राहिला आहे. यात परभणीतील तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी होत आहे.