Mon, Jul 15, 2019 23:37होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांनी पैसे भरल्यानंतर सुटले धरणातून पाणी

शेतकर्‍यांनी पैसे भरल्यानंतर सुटले धरणातून पाणी

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 11:06PMबीड : प्रतिनिधी

वडवणी तालुक्यातील उपळी येथील कुंडलिका धरणाचे नदीपात्रातील सोडलेल्या पाण्यावरून श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. या श्रेयवादाच्या कहाणीत आता पोलखोल करणार्‍या पैसे भरल्याच्या पावत्या समोर आल्याने यात अधिकच ट्वीस्ट आले आहे. कुंडलिका धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले नसून, शेतकरयांनी पै पै गोळा करून भरलेल्या पैशामुळे प्रशासनाने पाणी सोडल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

वडवणी तालुक्यातील उपळी येथील कुंडलिका धरणात या वर्षी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने आणि कुंडलिका नदी काठावरील गावात तीव्र पाणी टंचाई असल्याने धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी या नदी काठावरील गावातील शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे केली होती. 

प्रशासन पाणी सोडण्यास तयार होते, मात्र पाणी सोडण्या आधी पाणीपट्टी किमान दीड लाख रुपये शासनाच्या तिजोरीत भरणे गरजेचे होते. नदी काठावरील कुप्पा, उपळी, परडी, माटेगाव, राजेवाडी, धानोरा, केंडेपिपरी, दुकडेगाव या गावातील शेतकर्‍यांच्या मागणीला पाठिंबा देत विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्त्यांनी देखील प्रशासनाकडे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी केली होती. मात्र जो पर्यंत पैसे सरकारी तिजोरीत भरले जात नाहीत तो पर्यंत काही केल्या पाणी सोडले जाणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मग शेतकर्‍यांनी हालचाली करून आवश्यक रक्कम जमा केली आणि शासकीय तिजोरीत भरली. पैसे भरल्यानंतर पाणी सोडण्यास परवानगी दिली. पाण्यामुळे वडवणीत श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. अशा परिस्थितीत पैसे भरलेल्या शेतकर्‍यांनीच त्याच्या पावत्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यामुळे श्रेय घेणारेही तोंडघशी पडले जात आहेत. 
 

Tags : After payment of money farmers From the dam Water released