बीड : प्रतिनिधी
सुरेश अण्णा जोपर्यंत पुन्हा निवडून येऊन आमदार होत नाहीत तोपर्यंत अंगावर शर्ट घालणार नाही अशी प्रतिज्ञा धस यांच्या एका समर्थकाने चार वर्षांपूर्वी सुरेश धस यांच्या पराभवानंतर केली होती. मंगळवारी सुरेश धस पुन्हा एकदा आमदार झाल्याने तो समर्थक आता चार वर्षांनंतर शर्ट घालणार आहे.
अशोक तोडकर असे या धस समर्थकाचे नाव आहे. दिवसभर त्याच्या सर्व गप्पा अण्णा भोवतीच फिरत असतात. त्यांच्या प्रेमापोटी त्याने छातीच्या डाव्या बाजूवर आणि उजव्या हातावर अण्णा असे नावही गोंदवून घेतले आहे. चार वर्षांपूर्वी मागील विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांचा निसटता पराभव झाला आणि अशोक प्रचंड नाराज झाला. तेव्हाच अशोक तोडकर यांनी जेव्हा सुरेश धस पुन्हा आमदार होतील तेव्हाच अंगात शर्ट घालेल अशी प्रतिज्ञा केली.
या प्रतिज्ञेला अनुसरून गेल्या 4 वर्षांत ऊन, वार, पाऊस, हिवाळा अशा ऋतुची तमा न बाळगता अशोक यांनी शर्ट घातलेले नाही. विधान परिषदेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात सुरेश धस हे मोठ्या फरकाने निवडून येऊन पुन्हा आमदार झाले आहेत. त्यामुळे अशोक तोडकर यांनी केलेली प्रतिज्ञा सार्थकी लागली आहे. लाडक्या अण्णांच्या विजयाने भलताच खूश झालेल्या अशोक यांनी आता सुरेश धस आले की त्यांच्या समोरच शर्ट घालणार असे जाहीर केले आहे.