होमपेज › Marathwada › पीक कर्ज वाटपाचा टक्का पुढे सरकेेना

पीक कर्ज वाटपाचा टक्का पुढे सरकेेना

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 11:44PMहिंगोली : प्रतिनिधी

खरिपाची 40 टक्के पेरणी पूर्ण होत आली असतानाही राष्ट्रीयीकृत बँकासह खासगी बँकाकडून शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाबाबत टाळाटाळ केली जात असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. आतापर्यंत निर्धारित उद्दिष्टापैकी केवळ 6 टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. गुरुवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते पीक कर्ज वाटपाचा आढावा घेणार असल्यामुळे बँक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

मागील वर्षी राज्य 

शासनाने कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील 1 लाख 9 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी जवळपास 40 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफी झाल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केला आहे, तर उर्वरित शेतकरी खातेदाराच्या कर्जमाफीसाठी याद्यांची पडताळणी सुरू असल्याने नव्याने पीक कर्ज घेण्याबाबत शेतकर्‍यांना अडचणी येत आहे, तर दुसरीकडे यावर्षी खरीप पीक कर्ज वाटपासाठी राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँक, जिल्हा बँक आदींना 959 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. एप्रिलपासून प्रत्यक्षात पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली असली तरी आतापर्यंत केवळ 5.59 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. मागील आठवडाभरापासून पेरण्या सुरू झाल्या आहेत. पेरणीसाठी खते व बियाणे खरेदी करावे लागत असतानाही पीक कर्ज उपलब्ध झाले नसतानाही शेतकर्‍यांना उसनवारी करून पेरणी करावी लागली आहे. 

जिल्हाधिकारी वारंवार बँक अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याच्या सूचना करीत आहे, परंतु निर्ढावलेले बँक अधिकारी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित असल्याचे चित्र समोर आले आहे. आज दि. 28 जून रोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते हे जिल्हा दौर्‍यावर येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर लिड बँकेच्या अधिकार्‍यांकडून पीक कर्ज वाटपाचा अद्ययावत आकडा संकलित करण्यात येत होता. परिवहन मंत्री रावते हे स्वतः पीक कर्ज वाटपाचा आढावा घेणार असल्यामुळे बँक अधिकार्‍यांची धावपळ झाली असून आकडे जुळवाजुळवीत बँक अधिकारी मग्न असल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.