Thu, Jul 18, 2019 02:39होमपेज › Marathwada › अधिकमास : खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी धडपड

अधिकमास : खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी धडपड

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 18 2018 12:03AMसेलू : संतोष कुलकर्णी

तीन वर्षांतून एकदा अधिकमास येतो. यावर्षाच्या अधिकमासाला 16 मेपासून सुरुवात झाली आहे. यामुळे नवीन लग्न झालेले जावईबापू जाम खुश झाले आहेत. तसेच खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी मात्र सासरेबुवांची चांगलीच धावपळ  सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकंदर जावई मस्त..तर सासरे त्रस्त ..अशी परिस्थिती अधिकमासात  दिसणार आहे.

दर तीन वर्षांनी अधिकमास (धोंड्याचा महिना) येतो. या महिन्यात सासरी असलेल्या लेकीस व जावईबापूस मुलींचे वडील आपल्या घरी धोंडे जेवणाकरिता आवर्जून बोलावतात. त्यांचा आमरसाने चांगला पाहुणचार व नवीन कपड्यांचा आहेर आणि यथा शक्तीप्रमाणे सोन्याची अंगठी घालण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. ही प्रथा आजही शहरासह ग्रामीण भागात जपली जाते. 

अधिकमासाची चाहूल लागताच जावईबापूंच्या चेहर्‍यांवर आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. मात्र सासरेबुवांचा चेहरा चिंताजनक बनला आहे. 16 मेपासून अधिकमास प्रारंभ झाला असून सासुबाई जावईबापू व लेकीस निमंत्रण देण्यासाठी पतीराजाची मनधरणी करीत आसल्याचे चित्र शहरी व ग्रामीण भागात दिसून येत आहे. यावर्षी विवाहबद्ध झालेल्या जावईबापूंचा आमरस मात्र निश्‍चित समजला जात आहे.

अधिकमासाची अख्यायिका : अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्याने इच्छित फळप्राप्ती होते अशी आख्यायिका आहे असे वेदमूर्ती बबनस्वामी चारठाणकर यांनी सांगितले. हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे 355 दिवसांचे वर्षे असते.पण इंग्रजी व भारतीय सौर वर्षे 365 दिवसाचे असते. प्रत्येक वर्षात 11 दिवसांची तफावत येते. तीन वर्षाला हा फरक काढला जातो. यामुळे या फरकाच्या कलावधीला अधिकमास म्हणून गणले जाते असेही पुरोहित यांनी सांगितले आहे.

दुष्काळात तेरावा महिना : काही दिवसांपूर्वी वादळी वारा ,बोंडआळी, गारपिटीने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच खरीप व रब्बी हंगामात अपेक्षित उत्पादन न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. पुन्हा खरीप पेरणी तोंडावर आल्याने पूर्वतयारीची मशागत व खत बिबियाने याचे नियोजन करत असताना अशा परिस्थितीत अधिकमास आल्याने जावईबापू यांना नाखुश करता येणार नाही यामुळे बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे. यंदाचा अधिकमास हा दुष्काळात तेरावा महिना असल्याची प्रतिक्रिया काही जाणकार सासरेबुवांनी व्यक्त केली.