Fri, Mar 22, 2019 05:50
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › विद्यार्थ्यांनी यशासाठी संकटावर मात करावी

विद्यार्थ्यांनी यशासाठी संकटावर मात करावी

Published On: Jul 04 2018 2:15AM | Last Updated: Jul 04 2018 12:22AMपरभणी : प्रतिनिधी

दैववाद बाजूला सारून प्रयत्नवादी बना, आत्मसौंदर्याचा शोध घेऊन करिअर निवडा, शिक्षणानंतर दुसर्‍यांसाठी वाट बनविता यावी, असा संकल्प ठेवून निवडलेल्या क्षेत्रात प्रयत्न करा, यश  नेहमीच तुमच्यासोबत असेल. उद्दिष्ट गाठण्यासाठी बेभान होऊन परिश्रम घ्यावे लागतात. यासाठी परफ्युमच्या सुगंधापेक्षा स्वतःच्या घामाचा सुगंध ओळखून परिश्रम करावे लागतात. यासाठी विद्यार्थ्यांनो आलेल्या संकटावर मात करून यश संपादनाची धमक ठेव,  असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते तथा प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. 

येथील अक्षदा मंगल कार्यालयात शिवसेना परभणी विधानसभेतर्फे सलग तिसर्‍या वर्षी दहावी-बारावी व नीट परीक्षांसह अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कोल्हे बोलत होते. मंचावर औरंगाबाद येथील शिक्षण तज्ज्ञ प्रा. रवींद्र बनसोड, जि. प. सीईओ बी. पी. पृथ्वीराज, मनपा आयुक्‍त रमेश पवार, प्राचार्य बाळासाहेब जाधव,  आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजू सुरवसे, मनपा उपायुक्‍त डॉ. विद्या गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सोपान आवचार, शिवसेना तालुकाप्रमुख नंदू पाटील, रामेश्‍वर पवार, बाळराजे तळेकर, बाळासाहेब राके, अंबिका डहाळे, नगरसेवक प्रशास ठाकूर, सुशील कांबळे, नंदू आवचार, दलित आघाडीचे शहरप्रमुख अमोल गायकवाड, रवींद्र धर्मे हे उपस्थित होते.

डॉ. कोल्हे यांनी ऐतिहासिक व वास्तविक जीवनातील एकेक प्रेरणादायी प्रसंग कथन करून विद्यार्थ्यांना संस्कृतीची जाणीव ठेवून यश मिळवण्याचे आवाहन केले.  प्रा. रवींद्र बनसोड यांनी शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा बेस स्ट्राँग करावा. शिक्षण हे नोकरी, पैसा, सुखासाठी नव्हे तर जीवनात मिळेल त्या क्षेत्रात यश संपादित करण्यासाठी घ्यावे. आपण निवडलेल्या करिअरवर निष्ठा ठेवून त्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आपल्या भाषणात सांगितले. आ. डॉ. राहुल पाटील यांनी परभणी नगरीला शैक्षणिक पंढरी बनवण्याचा मनोदय व्यक्‍त केला. वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाड्यावर अन्याय होत असून 70 टक्के इतर व मराठवाड्यासाठी केवळ 30 टक्के प्रवेश ही अट रद्द करण्यासाठी विधीमंडळात आवाज उठविण्यात येईल. जोपर्यंत ही अट रद्द होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.नावंदर, प्राचार्य डॉ. जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्‍त करून उपस्थित गुणवंतांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गंगाप्रसाद आणेराव तर सूत्रसंचलन अभय कुलकर्णी यांनी केले.