Tue, Apr 23, 2019 23:57होमपेज › Marathwada › उडीद घोटाळ्यातील दोषींवर होणार कारवाई 

उडीद घोटाळ्यातील दोषींवर होणार कारवाई 

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:07PMबीड : प्रतिनिधी 

2012-13 मध्ये बीड आणि गेवराई येथील मार्केट कमिटीच्या खरेदी केंद्रामध्ये कोटयावधी रुपयांचा उडीद घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. या उडीद घोटाळयाच्या चौकशीसाठी 31 मार्च 2015 दरम्यान विधान परिषदेमध्ये आ. विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना दाखल करून शासनाचे लक्ष या घोटाळयाकडे वेधले होते. या प्रकरणी मंगळवारी मुुंबईत झालेल्या बैठकीत उडीद घोटाळयाशी संबंधीत बँकांचे संचालक, बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, फेडरेशनचे अधिकारी, व्यापारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे  शासनाकडे प्रस्तावीत केले आहे. या बैठकीस आ. विनायकराव मेटे, आ. अमरसिंह पंडित व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेवराई आणि बीड येथील सरकारी केंद्रात उडीद खरेदी करताना लाखो रुपयांचा घोटाळा माहितीच्या अधिकारात उघडकीस आला होता. ज्या 1220 शेतकर्‍यांकडून उडीद खरेदी करण्यात आला, त्यातील 142 जणांच्या नावावर शेतीच नसल्याचे आढळून आले आहे. तर तलाठ्यांशी संगनमत करून 218 हेक्टर क्षेत्रात अधिकचा उडदाचा पेरा दाखविण्यात आला आणि हमीभावापेक्षा कमी रकमेने खरेदी केलेले उडीद शासनाला मात्र हमीभावाने विकले. या प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता.  हमीभावाने उडीद खरेदी करण्याच्या योजनेंतर्गत अधिकारी, व्यापारी यांनी संगनमत करून सातबारावर बनावट पेरा नोंदवला. या घोटाळ्यात मार्केटिंग फेडरेशन, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, तलाठी व बँकेच्या अधिकार्‍यांचाही सहभाग आहे. गेल्या वर्षी हमीभावानुसार उडीद खरेदी करण्यासाठी गेवराई आणि बीड येथे दोन केंद्र सुरू करण्यात आले होते. 

प्रतिक्विंटल 4 हजार 400 रुपये उडदाचा भाव होता. प्रत्यक्ष खरेदी करताना शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावरील पेर्‍याअनुसार उडदाची खरेदी करून पैसे धनादेशाद्वारे देणे या योजनेत बंधनकारक होते.

साडेचार कोटींचा गैरव्यवहार

तलाठ्याशी संगनमत करून सातबार्‍याच्या उतार्‍यावर 218 हेक्टर क्षेत्रात पेरा दाखवून 2200 क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला. यात 98 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला. 302 शेतकर्‍यांनी उडदाचा पेरा केलेला नसतानाही त्यांच्या नावावर 662 हेक्टराची नोंद घेण्यात आली. त्यांच्याकडून 5 हजार 519 क्विंटल उडीद खरेदी करण्यात आले. हमीभावात तफावत ठेवून यात अडीच कोटी रुपयांचा घोटाळा झाला. 

एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या नावे अनेक वेळा उडदाची खरेदी दाखविण्यात आली. 331 कुटुंबांतील 649 व्यक्तींच्या नावावर 12 हजार क्‍विंटल उडीद खरेदी झाले. यात साडेचार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. गेवराई, शिरूर, माजलगाव आणि वडवणी तालुक्यात उडीद पिकाचा पेरा झाला नसल्याचा कृषी अधीक्षकांचा अहवाल आहे. प्रत्यक्षात या तीन तालुक्यांतून 339 शेतकर्‍यांनी 5 हजार 420 क्विंटल उडदाची विक्री केल्याचे माहितीच्या अधिकारातील कागदपत्रात दिसून येते.