Sat, Apr 20, 2019 07:52होमपेज › Marathwada › मुख्यालय सोडणार्‍या कर्मचार्‍यांवर  कारवाई

मुख्यालय सोडणार्‍या कर्मचार्‍यांवर  कारवाई

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 11:54PMपरभणी : प्रतिनिधी 

क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत कामकाजासाठी नेमलेल्या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे अनुपस्थितीबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाागाच्या वतीने घेण्यात आला आहे. 

राज्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य कार्यालयांतर्गत असलेल्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी हे नेहमीच कार्यालयांना दांडी मारत असल्याची ओरड सर्वत्र होत आहे. याबाबत शासनाकडे मोठ्या प्रमाणात निवेदनांचा पाऊसही पडलेला आहे. याची शासन स्तरावरून शहानिशा करण्यात आली. यावेळी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन दिवशी कामकाजासाठी विहीत ठरवलेल्या वेळेत कार्यालयात हजर राहत नसल्याचे उघड झालेले आहे. ते अनुपस्थितीबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांची कुठलीही परवानगी घेत नसल्याचाही उलगडा झाला आहे. तसेच अनुपस्थितीबाबत वरिष्ठांना पूर्वकल्पना देत नाहीत. मुख्यालय सोडताना किंवा दौर्‍याकरिता जाताना पूर्वपरवानगी घेत नसल्याचे स्पष्ट झाले असून कार्यालयीन शिस्तपालन आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचेही निर्णयात नमूद केले आहे. अशा सर्व प्रकारांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळणे दुरापास्त होत असल्याची ओरड होत असल्याचे निदर्शनास आले. क्षेत्रीय स्तरावर उपसंचालक व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्व कार्यालयांमधील मुख्यालयात विनाअनुमती अनुपस्थित राहणार्‍या व वास्तव्यास न राहणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची माहिती संकलित करून ती आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयास तत्काळ कळविण्याचेही आदेशित करण्यात आलेले आहे.