Fri, Nov 16, 2018 19:21होमपेज › Marathwada › गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईला सल्‍लागार मंडळाची स्थगिती

गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईला सल्‍लागार मंडळाची स्थगिती

Published On: Jul 04 2018 2:25AM | Last Updated: Jul 04 2018 2:24AMबीड : प्रतिनिधी

सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्‍या व कायदा व सुव्यवस्थेत वारंवार अडथळा निर्माण करणार्‍या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारत जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील दहा प्रकरणातील गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची (एमपीडीए) चा निर्णय घेतला होता. संबंधितांनी अपिल केल्यामुळे सल्लागार मंडळाने या कारवाईला स्थगिती देत जिल्हाधिकार्‍यांचे आदेश रद्द केल्याचा प्रकार समोर आला आहे. या निर्णयामुळे आरोपींना अभय मिळाल्याची चर्चा आहे. 

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह हे बीड जिल्ह्यात रुजू झाल्यापासून आत्तापर्यंत विविध गुन्ह्यात सहभाग असणार्‍या तसेच दहशत पसरविणार्‍या 11 आरोपींवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. यामध्ये अशोक किसन जाधव (रा.कडा ता.आष्टी), उमाकांत ऊर्फ काकासाहेब देवीदास जोगदंड (रा.देवी बाभुळगाव ता.बीड), अरूण अंबादास कचरे (रा.राजेगाव ता.माजलगाव), बाबासाहेब रुपचंद आडे (रा.राडीतांडा ता.अंबाजोगाई), नाना सुदाम सुतार (रा.पुरग्रस्त कॉलनी बीड), लक्ष्मण गवारे (रा.फुलेनगर परळी), गणेश ऊर्फ टिनू गोरख शितळे (रा.जिजाऊनगर बार्शीरोड बीड), वसीम खान अफजल खान पठाण (रा.किल्ला मैदान हत्तीखाना बीड), सोमनाथ गिर्गे (रा.गंगावाडी ता.गेवराई), पंडित सुदामराव गाडेकर (रा.रेवकी देवकी ता.गेवराई), संतोष शेजाळ (रा.रेवकी देवकी ता.गेवराई) या 11 जणांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्यावरील कारवाईच्या विरोधात शासनाच्या सल्लागार मंडळाकडे अपिल दाखल केले होते. आणखी दोन आरोपींवर सदर कारवाई प्रस्तावित आहे. त्याला जिल्हाधिकार्‍यांची मंजुरीही मिळालेली आहे, मात्र सदरील आरोपी हे सध्या फरार असल्याने प्रशासनाने अद्याप त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.