होमपेज › Marathwada › अपघात विम्याच्या रकमेची कपात नाही

अपघात विम्याच्या रकमेची कपात नाही

Published On: Mar 18 2018 1:46AM | Last Updated: Mar 18 2018 1:51AMअंबाजोगाई : प्रतिनिधी

शासन निर्णयानंतरही शिक्षकांच्या वेतनातून सामूहिक अपघात विमा योजनेची रक्कम कपात करण्यात आली नाही. त्यामुळे या शिक्षकांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाने राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांसाठी राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू केली आहे. त्याचा लाभ देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून विमा रकमेची कपात करून घेण्याच्या सूचना सर्वच विभागांना दिल्या आहेत, परंतु शासकीय आणि खासगी शाळांच्या शिक्षकांच्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून विमा प्रीमियमची कपात केली नाही.

राज्य शासकीय कर्मचारी समूह, वैयक्तिक अपघात विमा योजना, महाराष्ट्र संवर्गातील भारतीय प्रशासकीय सेवेतील, भारतीय पोलिस सेवेतील व भारतीय वन सेवेतील अधिकारी तसेच सर्व राज्य शासकीय कर्मचार्‍यांना आणि प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय अधिकारी-कर्मचार्‍यांना ही लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने 18 फेब्रुवारी 2017 रोजी घेतला होता. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांचाही समावेश असून एप्रिल 2017 पासून ही योजना अमलात आली आहे. या निर्णयानुसार सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षकांच्या वेतनातून 354 रुपये प्रमाणे कपात करणे आवश्यक होते. त्यासाठी संचालक लेखा व कोषागरे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सेवार्थ व्यवस्थाही केली आहे. या प्रणालीनुसार जिल्हा परिषदेच्या वेतन पथकाने शिक्षकाच्या वेतनातून विमा रक्कम कपात करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे शिक्षकांना योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार समूह अपघात विमा योजनाही शासकीय कर्मचार्‍यांसाठी अतिशय आवश्यक बाब आहे त्यामुळे प्रशासनाने निर्णयाची अंमलबजावणी करून वेतनातून कपात करणे आवश्यक होते.

Accident, insurance, not, reduction, Beed news