Sun, Apr 21, 2019 04:37होमपेज › Marathwada › हरभरा खरेदी करण्यास अद्यापही मुहूर्त लागेना

हरभरा खरेदी करण्यास अद्यापही मुहूर्त लागेना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

हिंगोली : प्रतिनिधी

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाने शेतीमालाची खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात पाच केंद्रामार्फत हरभर्‍याची खरेदी करण्यास अद्यापही मुहूर्त लागला नसून ग्रेडरअभावी नाफेड कडून हरभर्‍याची खरेदी सुरू न झाल्याने हरभरा उत्पादक शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांना पड्या दराने आपला माल विकावा लागत आहेत. नाफेडकडे जवळपास साडेचारशे शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. 

हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्याच्या प्रक्रियेला हिंगोलीतील सर्वच केंद्रांवर लाचेचे ग्रहण लागल्याने शेतकरी आपला माल हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी धजावत नसल्याचे चित्र हरभर्‍याच्या नोंदणी वरून समोर आले आहे. हिंगोली जिल्ह्यात नाफेडअंतर्गत हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार येथे खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शेतकर्‍यांनी आपला माल विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. 28 मार्चपर्यंत हिंगोली केंद्रावर 13, सेनगाव केंद्रावर 18, कळमनुरी केंद्रावर 210, वसमत केंद्रावर 162 तर, जवळा बाजार केंद्रावर 50 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

महिनाभरापूर्वी हरभर्‍याची खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. केंद्रशासनाने जाहीर केलेल्या 4 हजार 400 रुपये प्रतिक्विंटलच्या हमी दराने खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी केली जाणार आहे. मागील महिनाभरापासून शेतकरी हरभरा खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत, परंतु नाफेडकडून ग्रेडर उपलब्ध करून देण्यात आले नसल्यामुळे हरभरा खरेदीला अद्यापही मुहूर्त लागला नसल्याने नाइलाजाने शेतकर्‍यांना आपला माल खासगी व्यापार्‍यांच्या घशात घालावा लागत आहे. शासनाने जाहीर केलेल्या 4 हजार 400 रुपयांच्या भावापेक्षा 1 हजार रुपये कमी दराने बाजारात हरभरा खरेदी केली जात आहे.

Tags : Marathwada, Marathwada News, half  million, farmers, registered, online,  Nafed.


  •