Wed, Apr 24, 2019 12:35होमपेज › Marathwada › आजीबाईला हृदयविकाराचा झटका; बस रुग्णालयात

आजीबाईला हृदयविकाराचा झटका; बस रुग्णालयात

Published On: Sep 07 2018 1:08AM | Last Updated: Sep 07 2018 1:08AMगेवराई : प्रतिनिधी

वेळ दुपारी 12 वाजण्याची... लातूर-यावल (जि. जळगाव) ही बस गेवराईतील मोंढा भागात आली... यादरम्यान एका 76 वर्षीय वयोवृद्ध प्रवासी आजीला हृदयविकाराचा झटका आला... यावेळी बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बस थेट उपजिल्हा रुग्णालयात आणली. यामुळे वेळीच आजीवर उपचार झाल्याने आजीचे प्राण वाचले. बस अचानक उपजिल्हा रुग्णालयात आल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल (जि.जळगाव) आगाराची बस (क्रमांक एम एच 20 बीएल 3763) ही लातूर येथून यावलकडे 55 प्रवाशी घेऊन भरधाव वेगाने जात होती. या बसमध्ये अंबड तालुक्यातील महाकाळा येथील रुक्मिणबाई गंगाधर जाधव (वय 76 वर्ष) या आजी बीडहून शहागडकडे प्रवास करत होत्या, दरम्यान ही बस गेवराई शहराजवळील मोंढानाका येथे आली असता अचानक रुक्मिणबाई जाधव या आजीला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी आजीबाईच्या शेजारी बसलेल्या अन्य प्रवाशांनी हा प्रकार चालक व वाहकांना सांगितला. यानंतर बस चालक एस. आर. कोळी व वाहक पी. बी. राजपूत्र यांनी प्रसंगावधान राखून राष्ट्रीय महामार्गावरील येथील उपजिल्हा रुग्णालयात बस आणली. 

यानंतर आजीबाईला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले व आजीवर वेळीच डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार केल्याने आजीचा जीव वाचला. दरम्यान चालक, वाहक व सामाजिक कार्यकर्ते, बसमधून प्रवासी असलेले विजयसिंह शिंदे यांनी देखील आजीबाईला उपचारार्थ दाखल करण्यासाठी मदत केली, तसेच यानंतर आजीच्या नातेवाइकांना संपर्क साधून या प्रकाराची माहिती देण्यात आली होती. या प्रकाराची माहिती मिळताच येथील आगार प्रमुख एस. पी. साळुंके यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन आजीबाईची आस्थेवाईकपणे चौकशी केली.